नियमबाह्य सभेत माझ्यावर कोणी टीका केली तर त्याला मी किंमत देत नाही : पल्लवी पाटील

    महाबळेश्वर : कायदेशीर तरतुदींच्या अधीन राहून काम करणे हे माझे कर्तव्य आहे. नगराध्यक्षांनी २ जूनला सभा आयोजित केली होती त्या सभेला मी उपस्थित होते. मात्र, त्यानंतर ३ जूनची सभा ही नियमबाह्य असल्याने मी त्या सभेला उपस्थित राहिले नाही. या संदर्भात मी नगराध्यक्षांना पूर्वकल्पना दिली होती. ३ तारखेच्या नियमबाह्य सभेत माझ्यावर कोणी टीका केली तर त्याला मी किंमत देत नाही आणि त्या टीकेची दखल घेण्याचीही आवश्यक्ता वाटत नाही, अशी प्रतिक्रिया पालिकेच्या ‘सिंघम’ मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

    नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी २ जूनला आयोजित केलेली सर्वसाधारण सभा ही कोरमअभावी तहकूब करण्यात आली. ही सभा तहकूब करण्यात येत नाही ती रद्दतच करावी लागेल अशी सूचना पल्लवी पाटील यांनी नगराध्यक्षांना केली होती. मात्र, नगराध्यक्षांनी मुख्याधिकारी यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून सभा तहकूब करून तीच सभा ३ जून रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, नगराध्यक्षांनी घेतलेला हा निर्णय नियमबाह्य होता. त्यामुळे मुख्याधिकारी यांनी नगराध्यक्षांना पत्र देऊन आपण ३ जूनच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणार नाही, असे मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी कळविले होते.

    केवळ ३ नगरसेवकांची उपस्थिती

    ३ जूनच्या सभेला केवळ तीन नगरसेवक उपस्थित होते. याच सभेत नगराध्यक्षांचे पती नगरसेवक कुमार शिंदे यांनी मुख्याधिकारी यांना लक्ष्य करून त्यांच्यावर टीका केली. या संदर्भात पाटील यांना विचारले असता त्यांनी अशा टीकांची दखल घेण्याची गरज वाटत नाही. मी कोणत्याही कायदेशीर तरतूदींचा भंग केलेला नाही. भंग जर कोणी केला असेल तर तो नगराध्यक्षांनी केला आहे. नियमबाह्य सभेला उपस्थित राहणे मला बंधनकारक नाही, असेही त्या म्हणाल्या.

    सत्ताधारी गटात केवळ चार नगरसेवक

    शहरातील मागील काही महिन्यांचे राजकारण पाहता पालिकेतील १३ नगरसेवकांनी एकत्र ये‌ऊन विरोधी गट तयार केल्याने सत्ताधारी गट हा अल्पमतात आला आहे. सत्ताधारी गटात केवळ चार नगरसेवक उरले आहेत. चार नगरसेवकांना बरोबर घेऊन पालिकेचा कारभार करणे कठीण होऊन बसले आहे. अशातच पालिकेतील मुख्याधिकारी या कायदेशीर कामालाच पाठिंबा देतात. त्यामुळे सत्ताधारी गटाची मोठी अडचण होऊन बसली आहे. राजकारणातील या उलथापालथीमुळे सत्ताधारी गटात नैराश्याचे वातावरण पसरले असल्याने कधी पत्रकारांवर तर कधी मुख्याधिकारी यांच्यावर टीका करून त्यांना लक्ष केले जाते, अशी प्रतिक्रिया शहरातून व्यक्त केली जात आहे.