महाबळेश्वरला जाताय? तर तुम्हाला करावी लागणार रॅपिड अँटिजेन टेस्ट

    महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिध्द असलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. येथे दाखल होणाऱ्या पर्यटकांची दांडेघर नाक्यावर रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी संगिता राजापुरकर यांनी महाबळेश्वर येथील हिरडा विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत दिली. यावेळी तहसीलदार सुषमा चौधरी पाटील व माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर उपस्थित होते.

    सातारा जिल्हाधिकरी यांनी लॉकडाउनच्या नियमात शिथिलता जाहीर केली आहे. यानुसार शनिवार सकाळपासून महाबळेश्वर व पांचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. लॉकडाउनच्या नियमात कशाप्रकारे शिथिलता देण्यात आली याची माहिती देण्यासाठी आज हिरडा विश्रामगृहावर प्राताधिकारी संगिता राजापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वर येथील विविध संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रांताधिकारी यांनी अनलॉकबाबत सविस्तर माहिती दिली. येथे येणाऱ्या पर्यटकांची कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोना टेस्टचे अहवालबरोबर घेऊन येणारे पर्यटकांची पांचगणी येथील दांडेघर नाक्यावर रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट घेण्यात येणार आहे. यामध्ये ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशाच पर्यटकांना पांचगणी व महाबळेश्वर येथे प्रवेश देण्यात येणार आहे.

    बाजार पेठेतील दुकानदारांची कोरोना टेस्ट बंधनकारक आहे. व्यापारी व हॉटेलमधील कामगारांची दर दहा दिवसांनी कोरोना तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोनाबाबतचे सर्व नियम हॉटेल व्यवसायिक व व्यापारी यांना बंधनकारक करण्यात आले आहेत.
    या बैठकीला गट विकास अधिकारी नारायण घोलप, पांचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, महाबळेश्वर पालिकेच्या कर निरीक्षक भक्ती जाधव, हॉटेल संघटनेचे अध्यक्ष मनिष तेजाणी, दिलीप जव्हेरी, असिफ सय्यद, धिरेन नागपाल, योगेश बावळेकर, रोहन कोमटी, ॲड. संजय जंगम, सुर्यकांत जाधव, माजी नगरसेवक संतोष शिंदे, व्यापारी प्रतिनिधी अतुल सलागरे, नितीन शिंदे, प्रितम शिंदे, केतन यादव आदी मान्यवर उपस्थित होते.