आयआयए सातारा शाखेची कोविड लसीकरण मोहीम यशस्वी; ११३० नागरिकांना लस

    सातारा : दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या सातारा शाखेने आयोजित केलेली कोविड लसीकरण मोहीम जुनी एमआयडीसी सातारा येथील टॉर्क इंजिनिअरिंगच्या प्रशस्त जागेत 2 जुलै रोजी यशस्वीरित्या संपन्न झाली. छोटे उद्योजक व आस्थापनांना आपले कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी लसीकरणाची सोय हवी होती. सामाजिक जबाबदारीत आघाडीवर काम करीत असलेल्या आयआयए सातारा शाखेच्या सभासदांनी ही बाब लक्षात घेतली. मग त्यातून वास्तूविशारद ययाती टपळे व बेल एअर हॉस्पिटल पाचगणीचे फादर टॉमी यांच्या संकल्पनेतून या मोहिमेची सुरुवात झाली. बेल एअरने सरकारने दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी दरात म्हणजेच ७३० रुपये प्रतिडोस या दराने लस व लसीकरणासाठी लागणारी वैद्यकीय सहायता देण्याचे मान्य केले. तर आय.आय.ए. सातारा शाखेने संपूर्ण मोहिमेचे व्यवस्थापन करण्याचे ठरले.

    या संकल्पनेला आय.आय.ए. सातारा शाखेचे चेअरमन वास्तुविशारद सुहास तळेकर, व्हाईस चेअरमन वास्तुविशारद विपुल साळवणकर, सचिव वास्तुविशारद अनिरूध्द दोशी यांनीउचलून धरले व 2 जुलै रोजी सशुल्क लसीकरण कॅम्प आयोजित करण्याचे ठरविले व त्याच्या नियोजनाची संपुर्ण जबाबदारी संस्थेच्या तरूण सभासदांवर सोपविली. वास्तुविशारद मयुरगांधी व उपेंद्र पंडीत यांच्या नेतृत्वाखाली व वरील ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या सल्ल्याने संस्थेचे तरूण सभासद सर्व वास्तुविशारद श्रेयस वाळींबे, गौतम भुरके, हर्षवर्धन टपळे, स्वराली सगरे, स्नेहल शेडगे आदींनी कार्य क्रमाचे सखोल नियोजन केले व त्यानुसार लसीकरण पार पडले. प्रत्यक्ष लसीकरण स्थळी वास्तुविशारद सुजाता तळेकर, अद्वैत पाटणकर, श्रीकांत उथळे, ओंकार घाडगे यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली व त्याचे योग्य नियोजन वास्तूविशारद महाजनी यांनी केले.

    लसीकरणासाठी प्रशांत अहेरराव यांनी आपले दहा हजार चौ. फुटाचे शेड मोफत उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे कोविड विषयक सर्व निर्बंध पाळून लसीकरण करणे शक्य झाले. केंद्रस्थानी संपुर्ण वेळ प्राणवायूसह आपत्कालीन वैद्यकीय सुविधेसह कार्डिऍक ऍम्ब्युलन्स उपलब्ध देण्यात आली होती. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केंद्रस्थळी भेट देवून संपूर्ण नियोजनाची पाहणी केली. फादर टॉमी व टपळे यांनी एकूण कार्यक्रमाची माहिती जिल्हाधिकारी यांना दिली. योग्य व नीटनेटके नियोजन पाहून शेखर सिंह यांनी समाधान व्यक्त केले.

    या कार्यक्रमास छोटे उद्योजक, आस्थापना तसेच क्रिडाई सातारा व बी.ए.आय. सातारा यांचे पदाधिकारी व सदस्य यांनी भरघोस पाठिंबा देऊन लसीकरणाचा लाभ घेतला.