केळघर परिसरातील पूरबाधित कुटुंबांना त्वरीत मदत देणार : शंभूराज देसाई

केळघर परिसरात अतिवृष्टीने झालेले नुकसान व रेंगडी येथील दोन कुटुंबातील ४ जणांचा पुरात वाहून मृत्युमुखी झालेल्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

    केळघर : जावली तालुक्यातील केळघर परिसात झालेल्या अतिवृष्टीत व पुरात बोंडारवाडी, वाहिटे, भुतेघर, बाहुळेसह परिसरातील प्रत्येक गावात प्रचंड नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य सरकार आपल्या पाठीशी आहे, लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असे आश्वासन गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

    केळघर परिसरात अतिवृष्टीने झालेले नुकसान व रेंगडी येथील दोन कुटुंबातील ४ जणांचा पुरात वाहून मृत्युमुखी झालेल्या कुटुंबियांचे सांत्वन करून केळघर परिसरातील बोंडारवाडी, भुतेघर, बाहुळे, केंडंबे, पुनवडी, डांगरेघर, आंबेघर, तळोशी, वाळंजवाडी परिसरातील पुरपरस्थितीची पाहणी केली.

    यावेळी आमदार सदाशिव सपकाळ, प्रांतअधिकार सोपान टोन्पे, तहसीलदार राजेंद्र पोळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान मोहिते, गट विकास अधिकारी सतिश बुद्धे, शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे सातारा जावली विधानसभा संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, विजयराव मोकाशी, रेंगडीचे चंद्रकांत कासुर्डे, शिवरम सपकाळ, मंडल अधिकारी शेख, तलाठी मकरध्वज डोईफोडे, ग्रामसेवक रविकांत सपकाळ, तालुका प्रमुख विश्वनाथ धनावडे, सचिन करंजेकर, सचिन जवळ, संजय सुर्वे, प्रशांत जुनघरे, बाळासाहेब शिर्के यांचेसह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    यावेळी शंभुराज देसाई म्हणाले, या परिसरातील झालेले नुकसान भयंकर असून, या अतिवृष्टीत परिसरातील वेण्णा नदीपात्रालगतची संपूर्ण शेती पुराने वाहून गेली असून, परिसरातील ओढ्या लगतचीही शेती वाहून गेली आहे. परिसरातील प्रत्येक गावातील शेतीसह सार्वजनिक व खाजगी विहिरींचे, पुलांचे अतिवृष्टीत नुकसान झाले आहे. याचे ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

    केळघर परिसरातील पुरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली यावेळी परिसरातील शेतकऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते.