प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

    वाई : पूर्वीच्या प्रेमसंबंधातून युवक विवाहित असल्याने विवाहास का नकार दिला याचा जाब विचारत २५ वर्षीय युवतीला मारहाण करीत अपहरण करणाऱ्या जालना जिल्ह्यातील दोन युवकांना शिरवळ पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. याप्रकरणी शिरवळ पोलीसांनी कारसह तुषार भारतसिंग परदेशी (वय २८) व आशिष परमेश्वर काळबांडे (वय २२) या दोन तरुण अपहरणकर्त्यांना अटक केली.

    याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील संबंधित युवतीचे ८ वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यातील तुषार परदेशी या युवकाबरोबर प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, युवतीबरोबर लग्न करण्यास नकार दिल्याने तुषार परदेशी याच्या बरोबरचे प्रेमसंबंध युवतीने तोडून टाकले होते. यावेळी तुषारने संबंध तुटल्यानंतर पुन्हा युवतीला लग्नाची मागणी घातल्यानंतर युवतीने लग्न करण्यास नकार दिला होता. यावेळी तुषारने दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केले होते. त्यानंतर तुषार परदेशी हा जानेवारी २०२१ पासून सतत दूरध्वनीद्वारे मुलीला त्रास देत होता.

    दरम्यान,शुक्रवार दि. २ जुलै रोजी संमधीत युवती ही नेहमीप्रमाणे कंपनीमध्ये कामावर जाण्यासाठी शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या एका पतसंस्थेसमोर आली असता कार (क्र.एमएच-४३-एबी-२३४९) मधून आलेल्या तुषार परदेशी व कारचालक आशिष परमेश्वर काळबांडे हे त्याठिकाणी आले. यावेळी कारमधून तुषार परदेशी हा उतरल्यानंतर युवतीही महामार्गाच्या दिशेने पळत सुटली. तुषार परदेशी याने युवतीचा पाठलाग करून पकडून युवतीला कारमध्ये जबरदस्तीने बसविण्याचा प्रयत्न केला. युवतीने प्रतिकार केला असता तुषार परदेशी याने युवतीला मारहाण करीत जबरदस्तीने कारच्या पाठी मागील सिटवर बसवून कार सातारा बाजूकडे महामार्गावरून पलायन केले होते व पोलिसांना समजु नये म्हणून कार पुन्हा पुणे बाजूकडे जाणाऱ्या मार्गावर वळवली.

    या गंभीर घटनेची माहिती तत्काळ शिरवळ पोलीस स्टेशनला मिळताच शिरवळ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू अहिरराव, पोलीस हवालदार किशोर नलावडे, प्रशांत वाघमारे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, युवतीचा आरडाओरडा ऐकून सातारा बाजुकडून पुणे बाजूकडे निघालेल्या दुचाकीवरील एका जोडप्याने कारचा पाठलाग करीत कारला दुचाकी आडवी मारली. त्यामुळे संबंधितांनी कार थांबवली.

    यावेळी शिरवळ पोलीसांनी व उपस्थित नागरिकांनी घटनास्थळा वरून पलायन करणाऱ्या प्रेमवीर तुषार परदेशी व चालक आशिष काळबांडे याच्या कारसह अवघ्या १० मिनिटांमध्ये मुसक्या आवळत युवतीची सुटका केली. या घटनेची विनयभंग व अपहरणची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई करीत आहे.