‘KBC’ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या जीवनावरील प्रश्न

    कराड : कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय कार्यक्रमाला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. दूरचित्रवाहिनीवर या कार्यक्रमाचे आतापर्यंत १३ सिझन झालेले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या खास शैलीमुळे हा कार्यक्रम घरा-घरात पोहचला आहे. सध्या सुरु असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या जीवनावर आधारित एक प्रश्न विचारला गेला.

    मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरातील समीक्षा श्रीवास्तव यांना १ लाख ६० हजार रकमेसाठी एक प्रश्न विचारला, “महाराष्ट्राच्या कोणत्या माजी मुख्यमंत्र्यांचे एरोस्पेस इंजिनिअरिंग शिक्षण झालेले आहे.” यामध्ये ४ पर्याय समीक्षा यांना देण्यात आले होते. सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अब्दुल रहमान अंतुले, यशवंतराव चव्हाण या चार पर्यायांपैकी “पृथ्वीराज चव्हाण” हे बरोबर उत्तर समीक्षा यांनी तत्ज्ञांच्या मदतीने दिले व त्यांनी १ लाख ६० हजार रुपये इतकी रक्कम जिंकली.

    कराडकरांनीसाठी ही अत्यंत अभिमानस्पद गोष्ट आहे. कराडच्या उच्चशिक्षित नेतृत्वाच्या शिक्षणाची दखल या कार्यक्रमाने घेतली. पृथ्वीराज चव्हाण स्वच्छ प्रतिमेसोबतच उच्च शिक्षित म्हणून सुद्धा त्यांची ओळख देशभर व जगभर आहे.

    पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील प्रश्नाचे उत्तर समीक्षा यांनी दिल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिक्षणाची माहिती यावेळी सर्व प्रेक्षकांना दिली.

    ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी बर्कले येथील युनिव्हसिटी ऑफ कॅलिफोर्निया येथून एमएसची डिग्री घेण्याआधी आपल्या देशातील राजस्थानमधील नावाजलेले बिर्ला इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी अँड सायन्स म्हणजेच बिट्स पिलानीमधून इंजिनिरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते.