जांभळाच्या झाडांमुळे खटाव तालुक्याला ‘असा’ मिळाला दिलासा

  वडूज : उन्हाळ्यात रानावनात फिरून करवंदे, जांभळं गोळा करण्याची अनेकांना इच्छा असतेच. काहीजण मनमुराद त्याचा आस्वाद घेतात. पण, अलीकडे लॉकडाऊनमुळे घरातच बसावे लागत आहे. यावर पर्याय म्हणून आता खटाव तालुक्यातील वडूज, अंबवडे येथे घराशेजारील जांभळाच्या झाडाची जांभळे खाण्यासाठी आबालवृद्ध सामाजिक अंतर ठेवून हजेरी लावत आहेत.

  पूर्वी उन्हाळा सुरू झाला की, कलिंगड, कैरी, करवंदे, जांभळाचे वेध लागत होते. त्यानंतर पावसाळ्यात वादळी वाऱ्याने पाडाला आलेले आंबे, करवंदे, जांभळे जमिनीवर पडत होते. ती गोळा करून घरी घेऊन जात होते. काही वर्षांपासून आता मार्केटिंगच्या नव्या युगात ‘होम डिलिव्हरी’ होऊ लागली. शहरी भागात अशी झाडे फारशी नसतात. त्यामुळे गावाकडे या झाडांभोवती घिरट्या घालणाऱ्या अनेक पिढ्या होऊन गेल्या आहेत. सध्या रानातील फळे फारसे कोणी गोळा करून घरी घेऊन जात नाही. त्याची उत्सुकताही राहिली नाही. रानावनात फुकट मिळणारी जांभळे, करवंदे आता मौल्यवान बनली आहेत. फळ बाजार, मॉलमध्ये पॅकिंगमध्ये आता ती उपलब्ध केली जातात. लॉकडाऊनने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. घरातून बाहेर पडले तर दंड वसूल केला जातो, या भीतीने कोणी अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडत नाही.

  बामणोली, कास पठार येथील गरीब शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला हातभार लावणारी करवंदे व जांभळे आता शहरात विकण्यासाठी घेऊन जाता येत नाहीत. त्यामुळे जांभळाचा आस्वाद घेणे दुरापास्त झाले आहे. यावर पर्याय म्हणून वडूज येथील मुन्ना मुल्ला व अंबवडे येथील पै. शामराव पवार यांच्या दारातील जांभळाच्या झाडाला लागलेली जांभळं काढण्यासाठी दररोज हौशी लोक, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार व बच्चे कंपनी शासनाचे नियम पाळून जमा होत आहेत. त्यांना मनसोक्त जांभळे खाण्यासाठी मिळू लागली आहेत. दोघेजण झाडावर जातात व फांदी जोरजोरात हलवितात. तर चौघेजण खाली ताडपत्री किंवा लांब कापड धरून उभे असतात. त्यामुळे जांभळे जमिनीवर न पडता ताडपत्री किंवा कापडावर पडतात, ही जांभळे स्वच्छ धुवून त्यामध्ये मीठ घालतात. नंतर सर्व उपस्थित लोक त्याचा आस्वाद घेत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते.

  खटाव तालुक्यातील प्रत्येक गावात किमान वाड्यावस्तीवर एक तरी जांभळाचे झाड असल्याने लॉकडाऊन काळात लहान मुलांना जांभळे उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती शेतकरी कुटूंबातील लोकांनी दिली आहे.

  जांभळाचे आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व

  जांभळाचे आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. जांभळाचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी करण्यात येतो. जांभूळ आहे हे फळ मधुमेह, मुतखडा, अतिसार, मुरडा, संग्रहणी, यकृत रोग आणि रक्तजन्य विकारात अतिशय लाभदायक आहे.

  मधुमेहावर चांगला उपाय

  जांभळामध्ये अँटीडायबेटिक गुणधर्म असतात. त्यात असलेल्या अल्कोलिड्स केमिकलमुळे स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यास आळा बसतो आणि म्हणूनच रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राखले जाते. जांभळाच्या बिया सुकवून त्याची पावडर करा आणि दिवसातून तीनदा खा. मधुमेहावर हा अत्यंत चांगला उपाय आहे. दूध किंवा पाण्यासोबत ही पावडर सकाळी रिकाम्या पोटी घ्या. त्यामुळे देखील मधुमेह नियंत्रित राहील. हा उपाय पारंपरिक असून, अतिशय परिणामकारक आहे. त्यामुळे मधुमेहाचा शरीरावर होणारा दुष्परिणाम कमी होतो, अशी माहिती वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार मंडळींनी दिली आहे.