मार्डीत तरुणाईने केले ओसाड माळावर बीजारोपण

    वावरहिरे : जीवन जगण्यासाठी स्वच्छ आणि प्रदूषणरहित वातावरण गरजेचे असते. अशाप्रकारच्या वातावरण निर्मितीसाठी आपल्याला झाडांची आवश्यकता असते. ऊन-वारा पावसात उभे राहून झाडे आपल्याला फुले, फळे, सावली व शुद्ध हवा देतात. याच परोपकारीची जाणीव ठेवत मार्डी (ता. माण) येथे पाणी फाऊंडेशन व तरुणाईने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित साधत ओसाड माळरानावर सुमारे दहा हजार हेक्टर परिसरात करंज, चिंच, लिंब, सिताफळ आदी विविध बियांचे मोठ्या प्रमाणात बीजारोपण केले.

    सध्या सर्वत्र बेसुमार वृक्षतोड होत असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या उक्तीप्रमाणे मानवी जीवनातील वृक्षाचे महत्व जाणत निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात बीजारोपण व वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात केले पाहिजे, असे मत मोहन पाटोळे यांनी व्यक्त केले. प्रत्येक वर्षी येथील नागरिक पाणी टंचाईला समोरे जातात. मात्र, मार्डी परिसरात गेल्या दीड-दोन वर्षात मोठ्या प्रमाणात पाणी फाऊंडेशन व जलसंधारणाच्या माध्यमातून मोठा बदल झाला. या चळवळीच्या माध्यमातुन गावकऱ्यांनी एकी दाखवत मोठा बदल घडवून आणला. त्याचाच आज गावाला फायदा झाला. यावर्षी परिसरात पाणी टंचाई जाणवली नाही.

    जागतिक पर्यावरण दिनाचे औचित साधत येथील तरुणाईने कोंडीपोळ वस्ती परिसरात सुमारे दहा हजार हेक्टर परिसरात मोठ्या प्रमाणात बीजारोपण करुन पर्यावरण दिन खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष कृतीतून साजरा केल्याने परिसरात कौतुक होत आहे. बीजारोपण करण्यासाठी मोहन पाटोळे, यशवंत चव्हाण, चंद्रकांत पोळ, आबासाहेब पोळ, गणेश पवार, सुकृत सावंत, बापुराव सावंत, सुहास पोळ, सागर जळक, चैतन्य पोळ उपस्थित होते.