In Vadodara, the ‘Save in vain sacrifice, let’s save the Constitution campaign’ concludes

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने सुरु असलेल्या ‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाये संविधान’, अभियान आज सातारा जिल्ह्यातील वडूज येथे संपन्न झाले. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला.

    सातारा : केंद्रातील भाजपा सरकार आपली राष्ट्रीय संपत्ती दोन चार उद्योगदपती मित्रांच्या घशात घालत आहे. देशातील रस्ते, रेल्वे स्टेशन, रेल्वेमार्ग, ऊर्जा विभाग, गॅस पाईपलाईन, टेलिकॉम सेक्टर, गोडाऊन, खाणी, विमानतळे, बंदरे अशी पायाभूत क्षेत्रे उद्योगपतींना ६ लाख कोटी रुपयांसाठी ४० वर्ष लीजवर दिली आहेत. देशाची संपत्ती खाजगी लोकांना विकण्याचा सपाटाच लावला आहे. याला काँग्रेसचा विरोध असून देशाची संपत्ती लुटणाऱ्यांविरोधात उभे राहून देशाची संपत्ती विकू देणार नाही. देशाच्या संपत्तीचे मालक नागरिक आहेत, या संपत्तीचे जतन करु आणि देशाची संपत्ती लुटारुंपासून वाचवण्यासाठी काँग्रेस संघर्ष करेल, असे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी म्हटले आहे.

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने सुरु असलेल्या ‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाये संविधान’, अभियान आज सातारा जिल्ह्यातील वडूज येथे संपन्न झाले. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते.

    ७४ वर्षात देश उभा राहिला तो देश ७ वर्षात विकला

    स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्वांतत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर देश उभा करण्यात मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर देशाला जगात ताठ मानेने उभे केले, विकासाच्या विविध योजना राबवून देशात क्रांती घडवून आणली त्या पंडित नेहरुंचा विसर केंद्रातील भारतीय जनता पक्षाला पडला आहे. केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेताना पंडित नेहरुंचा फोटो टाकण्याचे सौजन्यही न दाखवता त्यांना वगळून देशाच्या स्वातंत्र्याप्राप्तीसाठी लढलेल्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. ७४ वर्षात देश उभा राहिला तो देश ७ वर्षात विकला जात आहे. ब्रिटीश राजवटीसारखेच केंद्रातील सध्याचे सरकार जुलमी अन्यायी, अत्याचारी, सरकार असून त्याविरोधात पेटून उठले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

    लोकशाही अबाधित राहिल का याची शंका

    यावेळी बोलताना विधीमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सातारा, वडूजची ही भूमी क्रांतीची भूमी आहे, साताऱ्याची भूमी देशातील क्रांतीकारकांची केंद्रबिंदू होती, या भूमीने देशाला ऊर्जा दिली आहे. १८५७ च्या उठावावेळीच या भूमीत स्वराज्याची मशाल पेटली होती. या भूमीतून क्रांतीकारक जन्माला आले. सरकार कसे असावे हे क्रांतीसिंह नाना पाटील यांनी दाखवून दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी देशाला संविधान देऊन सामान्य लोकांना ताकद दिली पण आता संविधान अबाधित राहिल का, लोकशाही अबाधित राहिल का याची शंका वाटते. २०१४ पासून देशातील चित्र बदलले आहे. दहा महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे, त्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर खिळे ठोकले, गोळीबार केला, शेतकरी रक्तबंबाळ झाले पण दिल्लीतील सरकार सुस्त पडून आहे शेतकऱ्यांची दखल ते सरकार घेत नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांवर जुलुम करत असताना महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन मोठा दिलासा दिला अशी ग्वाही थोरात यांनी दिली.

    देशात लोकशाही नसून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु

    माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की, साताऱ्याच्या भूमीतून क्रांतीसिंह नाना पाटील, स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासह शेकडो लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिले आहे. या स्वातंत्र्यचळवळीत वडूजच्या भूमीत ९ जणांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे त्या बलिदानाचा आपणास विसर पडू नये. आज देशातील चित्र बदललेले आहे, संविधान वाचवा असे म्हणायची वेळ आली आहे. केंद्रातील सरकार संविधान संपवण्याचे काम करत आहे. संस्थात्मक रचना ताब्यात घेऊन मनमानीपद्धतीने काम केले जात आहे.

    खऱ्या अर्थाने देशात लोकशाही राहिलेली नसून हुकूमशाही व्यवस्थेकडे आपली वाटचाल सुरु झाली आहे असे चित्र जगात निर्माण झाले आहे. पॅगेसीसच्या माध्यमातून हेरगिरी करून सर्वांची माहिती घेतली जात आहे, हे कोण करतेय याची चौकशी सरकार करत नाही. रशियातील केजीबीचा एक अधिकारी नंतर देशाचा पंतप्रधान झाला त्यानंतर राष्ट्राध्यक्ष झाला आणि आता आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष बनून रशियात एकाधिकारशाही आणली आहे भारताची वाटचालही रशियाच्या दिशेनेच सुरु आहे. तत्पूर्वी सकाळी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी वडूज येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले.