‘आम्हाला शासकीय सेवेत सामावून घ्या’; कोरोना योद्धा कर्मचारी परिषदेची मागणी

    सातारा : सातारा जिल्ह्यातील 152 कोविड कर्मचाऱ्यांना दोनच दिवसापूर्वी राज्य शासनाच्या आदेशाने कार्यमुक्त करण्यात आले. या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कोरोना योद्धा कर्मचारी परिषदेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. परिषद शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.

    सातारा जिल्ह्यातील कोरोना कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाने केलेल्या सेवामुक्तीचा साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एकमुखी निषेध केला. कोरोना योद्धा कर्मचारी परिषदेचे अध्यक्ष सोहेल पठाण, राहुल ठेंगल, अमोल गवई, शुभम वराणकर, रणजीत पाटोळे, अभिजीत चाळके, डॉ. मनोज विसपुते, विराज शेटे, दिपाली कोलपे, गणेश औटे, आझम शेख इ. आंदोलकांनी शासनाच्या या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करून सर्वांचे लक्ष वेधले. जिल्हा नियोजन समितीच्या 375 कोटीच्या अर्थसंकल्पात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी 98 कोटी 3 लाख रुपयांच्या निधीची तरतूद आहे. तरीसुद्धा कोरोना कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप कर्मचारी परिषदेच्या वतीने करण्यात आला.

    करोना कर्मचाऱ्यांना तत्काळ शासकीय सेवेत सामावून घ्यावे, तिसऱ्या लाटेसाठी स्वतंत्र कोविड कक्ष उभारून तेथे या कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, घोषित प्रोत्साहन भत्ता तत्काळ देण्यात यावा, ठेकेदाराच्या जाग्यावर करोना कर्मचाऱ्यांना कामाची संधी मिळावी, कर्मचाऱ्यांच्या सहा महिन्याच्या वेतनासाठी 2 कोटी 98 लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी, थकित मानधनाचा विषय तत्काळ निकाली निघावा, या मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना निवेदन दिले.

    या मागण्यांवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले. या विषयावर जोपर्यंत ठोस तोडगा निघत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरुच राहणार असल्याचा इशारा कोरोना योद्धा कर्मचारी परिषदेने दिला आहे .