वाईच्या एमआयडीसीत चोरट्यांचा धुमाकूळ; लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ

  वाई : वाई औद्योगिक परिसरात गेली काही दिवसांपासून लूटमार करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांचा व अवैध धंद्याचा अड्डा होत आहे. कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या मजूर व कामगारांबरोबरच औद्योगिक वसाहतीत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना भररस्त्यावर अडवून चोरटे लूटमार करीत आहेत. दिवसेंदिवस औद्योगिक वसाहत परिसरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होऊन, हा परिसर चोरट्यांचा अड्डा होवू लागला आहे.

  कंपनीत पगार झालेल्या कामगारांच्या खिशावर डल्ला मारून चोरटे पसार होत असल्याने, तसेच सातत्याने व दिवसरात्र होणाऱ्या लुटमारीच्या घटनांमुळे कामगारवर्गात व नागरिकांत मोठ्या प्रमाणात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मोकाट चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी औद्योगिक वसाहतीतील कामगारांनी केली आहे.

  वाई औद्योगिक वसाहतीत काही मोठ्या कंपन्यांबरोबरच अनेक लहान मोठ्या कंपन्या व लघुउद्योग सुरु आहेत. या कंपन्यांमध्ये शेकडो कामगार तीन शिफ्टमध्ये रात्रदिवस काम करीत आहेत. त्यामुळे या परिसरात कायमच मोठी वर्दळ असते. कंपनीत काम करणाऱ्या स्थानिक कामगारांबरोबरच परप्रांतीय कामगारांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे लूटमार करणारे चोरटे सावज हेरुन चाकूनचा धाक दाखवत अत्यंत चलाखीने व शिताफीने कामगारांची विशेषतः परप्रांतीय कामगारांची लूटमार करीत आहेत. त्यांच्याकडील पैसे, मोबाईल आदी चीजवस्तूंची लूट करीत आहेत. त्यामुळे सर्वच कामगार वर्गात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी विना नंबरच्या दुचाकींचा वापर तसेच तोंडाला रुमाल बांधून चोरटे योग्य संधी साधून, काही कळायच्या आतच पसार होत आहेत.

  अवैध धंदेही मोठ्या प्रमाणात सुरु

  औद्याोगिक वसाहत परिसरात लूटमारीबरोबरच अवैध धंदेही मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. त्यामुळे अनेक गैरप्रकारांत व घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये दुचाकींच्या चोऱ्याही होत आहेत. काहीजण मारामाऱ्या करून, स्वतःची दहशत निर्माण करणाचे प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. भीतीपोटी अनेकजण याबाबत पोलिसांत तक्रार देत नसल्याने चोरट्यांचे फावत असल्याने, पोलिस प्रशासनाने अशा घटनांवर वेळीच पायबंद घालणे अत्यंत गरजेचे आहे.

  दरम्यान, वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयडीसीमध्ये दिवसातून दोनवेळा पेट्रोलिंग चालू आहे. अशा प्रकारचे काही गुन्हे उघड ही केले आहेत. गैरप्रकार घडल्यास नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

  वाई औद्योगिक वसाहत परिसरात वारंवार लुटमारीच्या व गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. गुन्हेगारांच्या टोळ्यांमुळे येथील कामगार व उद्योजकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी अनेकदा प्राणघातक हल्ल्याच्या घटनांही घडत आहेत. या ठिकाणी पोलिस चौकीची वेळोवेळी मागणी करूनही ती मंजूर होत नाही. वाढत्या गुन्हेगारी टोळ्यांना पायबंद बसण्यासाठी वाई औद्योगिक परिसरात पोलीस चौकीची मोठी गरज आहे.

  – प्रदीप  चोरगे, व्यावसायिक, उद्योगिक वसाहत, वाई

  औद्योगिक वसाहतमधील चौकी सुरु करावी

  एमआयडीसीमधून मांढरदेवला जाणारा रस्ता असल्यामुळे औद्योगिक वसाहतमधील चांदणी चौकात पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस चौकी चालू केली आहे. तेथे पोलीस तैनात केल्यास व त्यांनी औद्योगिक वसाहत परिसरात पेट्रोलिंग  केल्यास अशा गैरप्रकरांना आळा बसेल व चोरट्यांना जरब बसेल, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.