‘महिलांसाठी स्वतंत्र आणि चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा निर्माण कराव्यात’ अजित पवार

आरोग्य विभागासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयामुळे चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. महिलांसाठी स्वतंत्र आणि चांगल्या दर्जाच्या सुविधा निर्माण कराव्यात. राज्यात काही ठिकाणी डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतोय. जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शहरी व ग्रामीण भागात फवारणी मोहीम हाती घ्यावी. असं उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटलं आहे.

    सातारा जिल्ह्यातील कोविड परिस्थिती, विकासकामं आणि अतिवृष्टीबाबत आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनानं राबवलेल्या कोविड प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती घेतली.

    यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘कोविडसाठी निर्माण करण्यात आलेल्या आरोग्य सुविधा पुढील काळासाठी उपयुक्त ठरणार आहेत. ऑक्सिजन प्रकल्पासारख्या सुविधांच्या देखभालीकडे विशेष लक्ष द्यावं. त्यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावं.’ अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केल्या.

    आरोग्य विभागासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयामुळे चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. महिलांसाठी स्वतंत्र आणि चांगल्या दर्जाच्या सुविधा निर्माण कराव्यात. राज्यात काही ठिकाणी डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतोय. जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शहरी व ग्रामीण भागात फवारणी मोहीम हाती घ्यावी. असं देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटलं आहे.

    राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून मंजूर १०० बेड्सच्या रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. कोविड चाचण्या कमी होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्त्यांच्या नुकसानाची आणि प्रकल्पातील पाणीसाठ्याची त्यांनी माहिती घेतली. व पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केलं.

    पुरात बेपत्ता झालेल्या ३ व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाची मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. आपणही त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं स्पष्ट केलं. शेतजमिनीचं नुकसान होणाऱ्या भागात पुराच्या पाण्यामुळे यापुढे अधिक नुकसान होऊ नये म्हणून मनरेगाच्या माध्यमातून कामं घेण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. पुरापासून रक्षण करण्यासाठी गावांचं पुनर्वसन करावयाचं असल्यास त्यासाठी जागा निश्चित करावी, असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.