केळघर घाटातील निकृष्ट कामांमुळे वाढला अपघाताचा धाेका

  केळघर : पावसाळ्यापूर्वी केळघर घाटातील संरक्षक मोऱ्या, रस्त्यावरील नाले यांची कामे समाधानकारक न झाल्याने पावसाळ्यात केळघर घाटातील वाट बिकट वाट ठरणार आहे. या ठिकाणी संरक्षक कठडे न बांधल्याने अपघातांना आयतेच निमंत्रण मिळत आहे. काळ्या कड्याच्या पुढील बाजूस एक संरक्षक मोरी पूर्णपणे निघाली आहे. त्याच ठिकाणी अरुंद रस्ता आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  चार पदरीकरणाचे काम धीम्या गतीने

  विटा-महाबळेश्वर रस्त्याचे चार पदरीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. लॉकडाउन होते. त्यामुळे घाटात वाहनांची वर्दळ कमी होती. त्यामुळे घाटातील रुंदीकरणाचे काम पूर्ण होणे आवश्यक होते. सध्या अनलॉकला सुरुवात होत असताना सर्व व्यवहार पूर्वपदावर येत असताना अजूनही काम पूर्ण न झाल्याने याचा फटका प्रवासी व पर्यटकांना बसू शकतो. वरोशी ते काळा कडा दरम्यान काम धीम्या गतीने सुरू आहे.

  नागमोडी वळणावर गाड्या दरीत

  घाटातील अवघड वळणांवर संरक्षक मोऱ्या काही ठिकाणी पूर्णपणे निघाल्या आहेत. काळा कडा येथे अवघड नागमोडी वळणावर वळणाचा अंदाज न आल्याने गाड्या दरीतून खाली जाण्याचे प्रकार घडले आहेत. घाटात गावांच्या जवळ रस्त्यावर दोन्ही बाजूने नाले काढणे आवश्यक आहे. काही ठिकाणी नाले न काढल्याने पावसाचे पाणी गावात शिरत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे ठेकेदाराने काम योग्य प्रकारे करावे अशी मागणी होत आहे.

  ”केळघर घाटातील रस्ता रुंदीकरणाचे काम निकृष्ट पणे व धीम्या गतीने सुरू असल्याने याचा फटका प्रवासी पर्यटकांना बसत आहे. केळघर घाटातील संरक्षक मोऱ्यांची कामे व्यवस्थित न झाल्याने अपघात होण्याची भीती अाहे. अवघड वळणांवर संरक्षक कठडे बसवले पाहिजेत.”

  – दत्तात्रय बेलोशे, सामाजिक कार्यकर्ते, केळघर