ह.भ.प. बंडातात्या कराडकर हे काय ‘ओसामा बिन लादेन’ आहेत का?; वारकरी आक्रमक

    दहिवडी : ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना नजरकैदेतून मुक्त करणे व पोलिसांनी ताब्यात घेऊन पहाटे ५ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत पाणी, अन्न न देऊन दिलेल्या अतिशय हीन व अपमानास्पद वागणुकीबाबत माण तालुक्यातील वारकरी संप्रदाय, व्यसनमुक्त युवक संघ, इंचगिरी किसन महाराज संप्रदाय, गोंदवलेकर महाराज संप्रदाय यांच्या वतीने माण खटाव प्रांत अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांना तक्रार वजा निवेदन देण्यात आले.

    सुमारे 3 महिन्यांपूर्वी २९ मार्च २०२१ रोजी देहू येथे वारकरी आंदोलन करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांना मर्यादित स्वरूपात व कोरोनाचे सर्व नियम पाळून आषाढी वारी पायी करू द्यावी, अशी समस्त वारकरी संप्रदायच्या वतीने विनंती करण्यात आली होती. त्यावेळी हवेलीचे प्रांत व पिंपरी चिंचवड अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनी शासनाच्या वतीने आमचे निवेदन स्विकारून आपल्यापर्यंत ते पोहोचवून आषाढीच्या आधी त्याचे नियोजन करण्यासाठी व चर्चा करून सकारात्मक मार्ग काढू असे आश्वासन दिले होते. त्यानंतरही एक महिना वाट पाहून मे २०२१ मध्ये ही आमची कोणत्याहीप्रकारे आंदोलन करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न करता चर्चेने समन्वय साधून प्रयत्न करू यासाठी पुन्हा आठवणीत करता शासनांस स्मरणपत्र दिले. त्यावेळेस विविध वारकरी संघटनांचे पत्रही जोडले होते.

    वेळोवेळी इशारा देऊनही काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे २ जुलै २०२१ रोजी आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाल्यावर पायी निघायचे आवाहन ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान व्यवस्थित पार पडावे. त्या सोहळ्याला व वारकरी परंपरेला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान पार पडल्यानंतर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी मर्यादीत वारकऱ्यांमध्ये पायी चालण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांनी अडवले व विनंती केली. तसेच काही सहकाऱ्यांनी ह.भ.प. तात्यांना समजावले त्यानुसार ह.भ.प.तात्यांनी दुसरे दिवशी ३ जुलैला पहाटे गाडीने आळंदीतून निघून जाण्याचे ठरले.

    ३ जुलै २०२१ रोजी पहाटे “केवळ ३ वारकरी” पायी निघाले म्हणून पोलिसांनी त्यांना पकडले. त्याचा जाब विचारण्यासाठी ह.भ.प. बंडातात्या सदर ठिकाणी गाडीने गेले असता पोलिसांनी ताब्यात घेऊन पहाटे ५ वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत पाणी व अन्न न देऊन अतिशय हीन व अपमानास्पद वागणूक दिली. ह.भ.प. बंडातात्या कराडकर हे काही “ओसामा बिन लादेन” नाहीत. कायदेशीर मार्गाने स्वतःचा स्वातंत्र्य व हक्काविषयी जागरूक असणे हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे. परंतु ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या गोशाळेत (मौजे करवडी, तालुका कराड, जिल्हा सातारा) येथे २ पोलिस २४ तास पहा-यासाठी ठेवले आहेत. ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांना नजरकैदेतून सन्मानाने मुक्त करावे. अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करून सरकारचा निषेध करू, असेही या निवेदनात म्हटले आहे.