जरंडेश्वरकडून व्यवस्थित कर्जफेड होतेय का?; ‘ईडी’ने मागितले सातारा जिल्हा बँकेकडे स्पष्टीकरण

  सातारा/नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जरंडेश्वरला दिलेल्या कर्ज प्रकरणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली आहे. ईडीची नोटीस मिळाल्यानंतर साताऱ्यात उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी या नोटिशीसंदर्भात खुलासा केला आहे. ईडीच्या नोटीस संदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी केले.

  सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकाही बँकेनं काय साांगितलं?

  सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीची नोटीस आली असून, कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर्स या कारखान्यासाठी नेमके किती कर्ज वितरित करण्यात आले, याबाबतचा खुलासा ईडीच्या नोटीशीमध्ये मागवण्यात आला आहे. याबाबत राजेंद्र सरकाळे यांनी या नोटीसबाबत खुलासा केला आहे.

  बँकेनं जरंडेश्वरला किती कर्ज दिलं?

  सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं 2017 पासून जरंडेश्वर कारखान्यासाठी 128 कोटीचे कर्ज वितरीत केले आहे. कारखान्याकडे सध्या 97 कोटी 37 लाख कर्ज शिल्लक आहे. जरंडेश्वर शुगरकडून वेळेत कर्ज फेडले जात आहे का? नेमके किती कर्ज वितरीत करण्यात आले आहे. याविषयीची माहिती ईडी कार्यालयाकडून मागवण्यात आली आहे, अशी माहिती राजेंद्र सरकाळे यांनी दिली. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुस्थितीत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केलं आहे.

  जरंडेश्वरला चार बँकांनी कर्ज दिल्याची माहिती समोर

  सध्या जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात असून, पुणे जिल्हा बँकेसह जरंडेश्वरला चार बँकांनी कर्ज दिल्याची माहिती समोर आली आहे. आता या कर्ज प्रकरणात सातारा जिल्हा बँकेचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ईडीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं सातारा जिल्हा बँकेला द्यावी लागणार आहेत.