कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रांताधिकारी कासार यांच्या सूचना; म्हणाले…

    वडूज : सद्यस्थितीत राज्यातील कोरोनाबाधित दर झपाट्याने कमी होत असला तरी खटाव तालुक्यात बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याची प्रशासनाने गंभीरपणे दखल घेतली असून, आजअखेर तालुक्यात सुमारे ९३० हून अधिक कोरोना बाधित असून, त्यापैकी ४९६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. मात्र, होम आयसोलेशन रुग्ण बहुतांश ठिकाणी बेजबाबदारपणे फिरत आहेत.

    या अशा रुग्णांमुळे कोरोनाबधितांची संख्या वाढल्याने याची गांभीर्याने दखल घेतली असून, घरात उपचार घेत असलेले प्रत्येक गावातील कोरोना रुग्ण तातडीने कोविड रुग्णालय किंवा गावातील कोरोना सेंटरमध्ये स्थलांतरीत करण्याचा आदेश खटाव उपविभागीय प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी काढले असून, या संदर्भात वडूज पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली.

    यावेळी तहसीलदार किरण जमदाडे, सहायक गटविकास अधिकारी भारत चौगुले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, पोलिस उपनिरीक्षक शीतल पालेकर, पोलीस पाटील, शासकीय कर्मचारी आदींची उपस्थिती होती.