‘जनता’ बँक लवकरच पुन्हा पूर्वपदावर येईल : सुरेशराव कोरडे

    वाई : जनता अर्बन को-ऑप. बँक लि., वाईची (Janata Urban Co-op Bank Ltd) ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. कोरोना संकटामुळे व शासनाच्या आदेशानुसार ही सभा ऑफलाईन घेता आली नाही. मात्र, ही सभा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुरेशराव कोरडे (Sureshrao Korade) यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

    यावेळी बँकेच्या उपाध्यक्षा सुनंदा फरांदे, बँकेचे संचालक- यशवंत सपकाळ, जगन्नाथ कदम, शामराव बनकर, बळीराम जगताप, त्रिंबक सोनावले, प्रविण ननावरे, सावता फरांदे, तज्ञ संचालक डॉ. विकास फरांदे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे संचालक मधुकर जाधव, मदन शिंदे, बँकेचे सरव्यवस्थापक रूपाली बुलुंगे तसेच बँकचे विशेष वसुली अधिकारी विजय लोखंडे, प्रशासन अधिकारी संदीप सपकाळ, हिशोब अधिकारी गणेश पिसाळ, आय.टी. अधिकारी सिद्धार्थ घाडगेव कर्मचारी उपस्थित होते.

    बँकेचे संस्थापक-अध्यक्ष सुरेशराव कोरडे यांनी सर्व सभासदांचे स्वागत करून बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. कोरोनासारख्या जागतिक संकटामुळे सर्वच क्षेत्रांची आर्थिक स्थिती दोलायमान झाली आहे. त्यामुळे बँकांच्या आर्थिक स्थितीवर दूरगामी परिणाम झालेला आहे. बँकेने एनपीए कमी करण्यासाठी व कर्जाचे वसुलीसाठी सर्व मोठ्या थकीत कर्जदारांविरुध्द वसुलीच्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्णत्वास गेल्या असल्याचे सांगून लवकरच कर्ज वसुली होऊन बँक पुन्हा पूर्वपदावर येऊन मार्च २०२२ अखेर नफा प्राप्त करेल व सर्व सभासदांना लाभांश देईल, असा विश्वास व्यक्त केला.

    बँकेचे असंख्य ग्राहक, सभासद, हितचिंतक यांच्या प्रतिसादामुळेच बँकेच्या प्रगतीमध्ये सातत्य राखण्यात यश मिळाले असून भविष्यातही सर्वांनी समन्वय आणि सुसंवादाची भूमिका स्विकारून बँकेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध रहावे. बँकेने आपले पारदर्शक व्यवहार, उत्कृष्ट ग्राहकसेवा आणि जास्तीत-जास्त अत्याधुनिक व तत्पर सेवा-सुविधा देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. समाजातील लहानात-लहान व्यक्तीपर्यंत बँकिंग सेवा पोहोचविणेचे कार्य यशस्वीपणे करत बँकेने आदर्श निर्माण केला आहे.