जरंडेश्वर साखर कारखाना पूर्ववत सुरु ठेवावा; तहसीलदारांना निवेदन

    वडूज : कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर या साखर कारखान्यावर ईडीने मागील चार दिवसांपूर्वी केलेल्या जप्तीच्या कारवाईमुळे या कारखान्यावर अवलंबून असलेले ऊस उत्पादक शेतकरी, कामगार पूर्णपणे अडचणीत सापडले. या साखर कारखाना हा बंद न करता पूर्ववत सुरू ठेवावा, या मागणीचे निवेदन माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांच्या वतीने वडूज तहसीलदार किरण जमदाडे यांना देण्यात आले.

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तेजस शिंदे, माजी सभापती संदीप मांडवे,माजी जि प सदस्य जितेंद्र पवार,प्रा.बंडा गोडसे,शशिकला जाधव, नियोजन मंडळाचे नंदू मोरे,तालुका अध्यक्ष बाळासाहेब पोळ, सागर साळुंखेआदींची उपस्थिती होती.

    जरंडेश्वर साखर कारखान्यावर चार दिवसांपूर्वी ईडीने केलेल्या जप्तीच्या कारवाईने कारखाना बंद राहिल्यास इतर तालुक्यातील तसेच खटाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतुकदार व कारख्यान्यावर अवलंबून असणाऱ्या शेकडो जणांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. ही कारवाई जाणीवपूर्वक करण्यात आली असून, खटावसह संपुर्ण सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरलेली आहे. मागील २ वर्षापासून वेळेत व भरपूर पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यात प्रंचड प्रमाणात ऊस लागवड झालेली आहे. यावर्षी खटाव तालुक्यामध्ये साधारण ९ ते १० हजार हेक्टर ऊस उपलब्ध आहे.

    मागील हंगामात फक्त खटाव तालुक्यातुन दोन लाख 29 हजार टन ऊस जरंडेश्वर कारखान्यास गाळपासाठी शेतकऱ्यांनी पाठवला होता. या कारखान्याचे व्यवस्थापन हे पारदर्शक व शिस्तबद्ध असल्यामुळे सदर कारखान्यास ऊस घालण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चढाओढ असते. योग्य वजन, योग्य दर व वेळेत बिल दिल्यामुळे या कारखान्यावर शेतकऱ्यांचा विश्वास वाढलेला आहे.

    ईडीने ही कारवाई थांबविली नाही व कारखाना वेळेवर ऊस गाळप करु शकला नाही तर यावर्षी ऊस उत्पादक हजारो शेतकरी हे ऊस गाळपापासून वंचित राहतील व त्यांचा ऊस शेतात पडून राहील. तसेच ऊस वाहतुक कंत्राटदार, तोडणी कंत्राटदार व कारखाना कर्मचारी या सर्वावर उपासमारीची वेळ येईल आधीच कोरोना या महामारीमुळे शेतकरी अडचणीत असताना जर हा कारखाना चालु राहीला नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय प्रर्याय राहणार नाही. तरी तात्काळ ईडीने चुकीची केलेली ही कारवाई स्थगित करावी, मागे घ्यावी आणि कारखाना वेळेत गाळपासाठी चालू करुन तमाम ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार, तोडणी कामगार व कारखाना कर्मचाऱ्यांना न्याय मिळवा अन्यथा नाईलाजास्तव आम्हास रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावे लागेल.” असंही या निवेदनात म्हटले आहे.