जावलीच्या शेतकऱ्यांनी ‘ई’ पीक नोंदणीचा लाभ घ्यावा : तहसीलदार राजेंद्र पोळ

    केळघर : २०२१-२०२२ या महसुली वर्षापासून ७/१२ वर पिकाची नोंदणी फक्त मोबाईलमध्ये ई पीक पाहणी ऍपच्या माध्यमातूनच होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः आपल्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी ऍप इन्स्टॉल करून प्रत्यक्ष आपल्या शेतात जाऊन आपल्या शेतातील पिकाची माहिती या ऍपमध्ये योग्यरीत्या अचूकपणे भरून पिकाचा फोटो काढून भरावयाची आहेत.

    यानंतर तलाठी कार्यालयामार्फत आपल्या शेतातील पीक पेऱ्याची माहिती भरली जाणार नाहीत, याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाची माहिती स्वतः भरणे आवश्यक आहेत, असे आवाहन जावलीचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी केले. शासनाने जाहिर केल्यानुसार ‘ई’ पिक नोंदणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेढ्याचे माजी उपसरपंच प्रकाश कदम यांच्या प्रत्यक्ष शेतात जावून परिसरातील शेतकऱ्यांना तहसिलदार पोळ यांनी मार्गदर्शन केले.

    याबाबत अधिक माहिती देताना तहसीलदार पोळ पुढे म्हणाले, ई पीक पाहणी ऍपमध्ये पीक नोंदणी ही मर्यादित वेळेतच म्हणजे १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीतच करायची आहेत, या कालावधीनंतर पीक पाहणी नोंद होणार नाही. कारण त्यानंतर रब्बी हंगामातील पिकांची ई पीक पाहणी सुरू होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या कालावधीतच आपल्या पिकाची नोंद तसेच शेतबांधावरील झाडांची नोंदणी ई पीक पाहणी ऍपच्या माध्यमातून करून घ्यावी.

    पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणण्याची सुवर्णसंधी

    सातबारा उताऱ्यावर पोटखराब क्षेत्र – अ हा प्रकार असेल आणि आपण ते क्षेत्र जमीन नांगरून किंवा सपाटीकरण करून लागवडीसाठी खाली आणलं असल्यास ते क्षेत्र लागवड योग्य पड क्षेत्रात नोंदणी केल्यास, त्या क्षेत्रावर देखील बँकेकडून पीक कर्ज मिळणार आहे. त्या क्षेत्रामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नुकसानभरपाई मिळणार आहे. त्या क्षेत्रासाठी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेता येईल. त्या क्षेत्राचा देखील पीक विमा अर्ज भरताना समावेश करता येणार आहे. एकदा पीक पाहणी नोंद केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही, त्यामुळे आपल्या पिकाची नोंद अचूकपणे करावी.