वडूज येथील जम्बो कोविड सेंटर जुलैअखेर पूर्ण करणार : प्रभाकर देशमुख

    वडूज : वडूज येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात अमेरिका-इंडिया फौंडेशनच्या वतीने उभारण्यात येणार्‍या जम्बो कोविड सेंटरचे काम जुलै महिनाअखेर पूर्ण करण्याचा निर्धार फौंडेशनचे वरिष्ठ अधिकारी व खटाव-माण च्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या पाहणीत करण्यात आला.

    कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, फौंडेशनचे प्रोजेक्ट हेड विनय अय्यर, साराप्लास्ट कंपनीचे कार्यकारी अधिकारी राजू खैर, उल्का सादलकर, प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसिलदार किरण जमदाडे, वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे, बांधकाम विभागाचे उपभियंता देसाई, शिवदास, नगराध्यक्ष सुनिल गोडसे, न. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव खांडेकर, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संजय चिवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी बोलताना देशमुख व कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, अमेरिका इंडिया फौंडेशन मार्फत राज्यात पाच ठिकाणी अशाप्रकारची जम्बो कोविड सेंटर्स उभारणार आहेत. यामध्ये बारामती, सांगली, जालना, अमरावती या मोठ्या शहरांचा समावेश आहे. चार जिल्ह्यांच्या ठिकाणामध्ये वडूजसारख्या तालुक्याच्या ठिकाणचा हॉस्पिटलसाठी समावेश करुन हुतात्मा नगरीला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या रुग्णालयात शंभर बेडचे हॉस्पिटल त्याचबरोबर रुग्णाबरोबर अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी प्रशस्त स्वच्छतागृह त्याचबरोबर रुग्णाबरोबर येणार्‍या नातेवाईकांसाठी निवार्‍याचीही तरतूद आहे. यावेळी अधिकार्‍यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात सुरु असणार्‍या सपाटीकरण, विद्युतीकरण कामांची पाहणी केली.

    माजी उपनगराध्यक्ष विपुल गोडसे, खरशिंगेचे उपसरपंच दिनकर शिंगाडे, उंबरमळेचे माजी सरपंच नवनाथ वलेकर, नगरसेवक राजेंद्र कुंभार, अक्षय थोरवे आदींसह मान्यवर उपस्थित होते.