म्हसवड शहरात सुरु होणार जम्बो कोविड सेंटर

    म्हसवड : म्हसवड येथे नियोजित असलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाच्या जागेची जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी करुन त्या ठिकाणी योग्य त्या सूचना करीत त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी देत म्हसवड शहरात लवकरच जम्बो कोविड सेंटर सुरु होत असल्याचे स्पष्ट केले.

    माण खटाव या दुष्काळी दोन तालुक्यातील वाढती कोरोनाबांधितांची संख्या व उपलब्ध बेडची संख्या यामुळे चांगल्या उपचाराची सोय या दोन तालुक्यात नव्हती. सातारा ते म्हसवड ९५ किलोमीटर अंतर रुग्णांना नेणे धोक्याचे होते. अशा परिस्थितीत आम्ही म्हसवडकर ग्रुपच्या युवकांनी लोकवर्गणीतून लोकसहभागातून १६ ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरु करुन सातशे ते आठशे रुग्णांचे जीव वाचवून पाच कोटी रुपये वाचवण्यात यश आले. आम्ही म्हसवडकरांच्या कोविडची चर्चा गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत गेली होती. याची दखल घेत अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माण खटावच्या जनतेसाठी माणमध्येच १५० खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभे करण्याच्या सूचना केल्यानंतर परवा जिल्हाधिकारी यांनी म्हसवडमध्ये येऊन पाहणी करुन शिक्कामोर्तब केले होते.

    ४ जूनला उपजिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व सातारा जिल्हा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दराडे यांनी नियोजित म्हसवड येथील जम्बो कोविडच्या जागेची पहाणी करुन प्रांतांधिकारी शैलेश सुर्यवंशी यांना तात्काळ लाईटच्या फिटिंगची, इमारत दुरुस्ती, स्वतंत्र लाईटचा ट्रान्सफार्मर आदींची व्यवस्था करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी दिल्या.

    जनतेला चांगली आरोग्य सुविधा मिळणार

    सध्या आम्ही म्हसवडकर ग्रुपचे लोकसहभागातून सुरु असलेल्या कोविड सेंटरमधील दोन इमारतींमध्ये माण खटावच्या जनतेसाठी म्हसवड येथे जम्बो कोविड हाॅस्पिटल कोरोनाबांधितांवर उपचार होणार असल्याने या जम्बो कोविड मंजूरीने माण खटावच्या जनतेला चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होईल. तसेच जनतेचा वेळ व पैशाची बचत होईल, असे प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.