वडूजमध्ये लवकरच सुरु होणार जम्बो कोविड सेंटर : बाळासाहेब पाटील

    वडूज/डॉ. विनोद खाडे : सद्यस्थितीत राज्यात काही ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, काही ठिकाणी मात्र बाधित संख्या दर चिंताजनक आहे. यातच म्युकरमायकोसिस, डेल्टासारखे आजारही मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. वडूजमध्ये लवकरच जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत जर कोरोनाची तिसरी लाट आलीच तर प्रशासकीय यंत्रणेला हातभार म्हणून आयसोलेशन सेंटरनी यापुढेही सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

    कोरोना काळातील मागील ६० दिवस अखंडपणे कार्यरत राहून सुमारे ४०० पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात यशस्वी झालेल्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील हुतात्मा आयसोलेशन सेंटरच्या समारोपप्रसंगी मंत्री बाळासाहेब पाटील बोलत होते. यावेळी प्रांत अधिकारी जनार्दन कासार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, तहसीलदार किरण जमदाडे, माजी सभापती व सेंटर संचालक संदीप मांडवे, प्रा. बंडा गोडसे, डॉ. महेश गुरव, डॉ. युनुस शेख, डॉ. सचिन साळुंखे, डॉ. कुंडलिक मांडवे, डॉ. प्रविण चव्हाण, डॉ. महेश माने, हणमंत कोळेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी मंत्री पाटील यांनी आयसोलेशन सेंटरमधील बाधित रुग्णांशी प्रत्यक्षपणे संपर्क साधून विचारपूस केली आणि कोरोनाबाधितांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. रुग्णांचा सकारात्मक प्रतिसाद पाहून मंत्री पाटील यांनी कौतुक केले. या आयसोलेशन सेंटरच्या कामात अथक परिश्रम घेतलेल्या संदीप मांडवे मित्र मंडळ, जनता गॅरेज ग्रुप, प्रयास सामाजिक संस्था, माणदेशी फाउंडेशन,वैद्यकीय कर्मचारी, जेवण, नाष्टा मोफत देणाऱ्या संस्था, व्यक्ती तसेच पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.