भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी करण पोरे

    म्हसवड : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष करण सुनिल पोरे (KARAN PORE) यांची भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. करण पोरे यांनी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतिशय जबाबदारीने काम करून कामाचा ठसा उमटवला म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे हस्ते निवडीचे पत्र पोरे यांना देण्यात आले आहे.

    या वेळी करण पोरे यांनी आपण राज्यात युवकांचे संघटन वाढवून ओबीसीच्या प्रश्नांना वाचा फोडून समस्त ओबीसी बांधवांना भाजपमध्ये आणून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढा उभारणार असल्याचे या निवडीनंतर सांगितले.

    यावेळी करण पोरे यांचे चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, योगेश टिळेकर, सुनिल पोरे यांनी अभिनंदन केले.

    युवकांचे मोठे संघटन सोबत असलेला कार्यकर्ता 

    गेल्या १० वर्षांपासून म्हसवडसह माण तालुक्याच्या राजकारणात सक्रीय होऊन सर्वसामान्य जनतेची सेवा करीत असलेल्या करण पोरे यांनी ग्रामीण भागातील युवकांचे मोठे संघटन उभे केले असुन, ग्रामीण भागातील युवकांच्या शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिल्यानेच करण पोरे यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्यावर उदयनराजेंचा मोठा प्रभाव असल्यानेच ते भाजपचे काम माण तालुक्यासह जिल्ह्यात उभारत आहेत. त्यांच्या कामाच्या पध्दतीवरुनच त्यांची सदर निवड करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.