केळघर परिसर : संततधार पावसाने रस्त्याकडेच्या शेतीचे नुकसान तर घाटात ठिकठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूकही ठप्प

दरड कोसळल्याने दरडीचे दगड, चिखल, माती मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आल्याने सातारा-महाबळेश्वर रस्त्यावर वाहतूक मंदावली होती.केळघर घाटात ७ ते ८ ठिकाणी दरडीचे दगड रस्त्यावर आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात संततधार पाऊस पडत आहे.

    केळघर : केळघर परिसरात पडत असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे व विटा-महाबळेश्वर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने पावसाचे पाणी शिरून रस्त्यालगतच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम संथपणे सुरू असल्याने व रस्त्याला नाले न काढल्याने केळघर येथील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे तर केळघर येथील आनंदा भिलारे यांचे स्ट्रॉबेरी लागवडीसाठी सुपिक केलेल्या शेतीचे व विहिरीचेही ओढ्याचे पाणी घुसुन प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे .

    केळघर:शेतात पाणी घुसल्याने आनंदा भिलारे यांच्या शेतीचे झालेले नुकसान

    तसेच केळघर घाटात आज सकाळी रेंगडी-वरोशी दरम्यान म्हसोबाचा ओढा येथे दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरड कोसळल्याने दरडीचे दगड, चिखल, माती मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आल्याने सातारा-महाबळेश्वर रस्त्यावर वाहतूक मंदावली होती.केळघर घाटात ७ ते ८ ठिकाणी दरडीचे दगड रस्त्यावर आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात संततधार पाऊस पडत आहे. मुख्य रस्त्यालगतच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मोरावळे, मेढा, केळघर ,मामुर्डी, आंबेघर, नांदगणे, गवडी, वरोशी,रेंगडी या गावातील रस्त्यालगतच्या शेतीत नाले नसल्यामुळे शेतीत पाणी घुसले आहे.मोरावळे येथील शेतकरी ज्योतिराम साळुंखे, दत्ता साळुंखे, विठ्ठल साळुंखे, कृष्णदेव साळुंखे यांच्या शेतात पाणी घुसून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर केळघर ओढा पूल येथील पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने पर्यायी रस्त्याला पुरेशा मोऱ्या नसल्याने पाण्याचा निचरा न झाल्याने ओढ्याकाठची दोन्ही बाजूची शेती जलमय झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

    केळघर परिसरात संततधार पाऊस सुरू असून दरडी हटविण्याचे काम सुरू असून वाहतूक सुरळीत होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्न करीत आहे. नाल्यांची कामे लवकरच पूर्ण केली जातील

    -कृष्णात निकम , उपकार्यकरी अभियंता बांधकाम विभाग