फलटण तालुक्यात तरुणाचे अपहरण करून खून; एका संशयितास अटक

    फलटण : जिंती येथून एका तरुणाचे तीन अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली होती. या अपहरण झालेल्या तरुणाचा खून झाला असून मृतदेह होळ येथे एका शेतात सापडला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत.

    फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, जिंती, ता. फलटण गावचे हद्दीतून जिंती पुल येथून 16 ऑगस्ट रात्री 9 च्या सुमारास शकील अकबर शेख (वय 21 वर्षे रा. विकासनगर जिंती) व त्याचा मित्र विकास रघुनाथ आवटे (रा. जिंती ता. फलटण) हे दोघे जण त्यांची बजाज बॉक्सर मोटारसायकल (एमएच 11 एस 4434) वर विकासनगर येथून कपडे आणण्यासाठी रणवरे वस्ती जिंती येथे गेले होते. ते कपडे घेऊन परत घरी येत असताना अज्ञात 3 लोकांनी त्यांच्या मोटार सायकलला गाडी आडवी मारुन त्यांना अडवले. शकील यास त्यांच्या मोटार सायकलच्या मधल्या सिटवर बसवून त्याची मोटार सायकल घेवून शकील यास अज्ञात लोकांनी अज्ञात कारणासाठी पळवून नेले होते. याबाबत खुशी शकील शेख (वय 22 वर्षे रा. जिंती ता.फलटण) यांच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

    या दाखल गुन्ह्याचा पोलिस तपास करीत असताना 17 ऑगस्ट होळ, ता. फलटण गावचे हद्दीत आपटे यांचे शेतामध्ये अपहृत शकील अकबर शेख हा तरुण मयत स्थितीत आढळून आला. शकील यास कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणासाठी पळवुन नेऊन त्याचा खून केला असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली असून, या गुन्ह्याच्या अनुषंगाने एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिस उपनिरीक्षक उस्मान शेख या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.