किसन वीरांनी जिल्ह्याला शाश्वत विकासाचा मार्ग दाखविला : मकरंद पाटील

    वाई : सहकारी व शैक्षणिक संस्थांच्या निर्मितीद्वारे किसन वीर यांनी भौतिक व आर्थिक विकासाचे उद्दिष्ट साधून सामाजिक विकासाचा पाया भक्कम केला, असे प्रतिपादन आमदार मकरंद पाटील यांनी केले. वाई पंचायत समिती आयोजित किसन वीर जयंती कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

    सातारा जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकारात शिस्त, पारदर्शकता आणण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळेच पुढे ही संस्था देशभर नावारूपास येऊ शकली. पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी साखर कारखान्याची निर्मिती करून शेतकऱ्यांना जीवनमान बदलण्याचा मार्ग दाखविण्यात ते यशस्वी झाले. आजची कारखान्याची अवस्था काय आहे,हा इथल्या चर्चेचा विषय नाही. मात्र, धोम धरणाच्या निर्मितीस प्रोत्साहन देऊन शेती सिंचनावर दिलेला भर जिल्ह्याच्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी शाश्वत विकासाचा मार्ग ठरला.

    राजकारणात शिस्त व दरारा कायम राखणाऱ्या या नेतृत्वाने संस्थांच्या उभारणी बरोबरच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नव्या नेतृत्वाची जडणघडण केली. किसन वीर आबांच्या पाठिंब्यामुळेच पुलोद मंत्रिमंडळ स्थापन होऊ शकले. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे नगराध्यक्ष अनिल सावंत, बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ, जिल्हा परिषद सदस्य संगीता मस्कर, प्रकाश चव्हाण, शारदा ननावरे, रंजना डगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    सभापती संगीता चव्हाण यांनी प्रास्ताविकात किसन वीरांच्या सर्वसमावेशक विचारधारेतून सातारा विकासाचे ‘रोल मॉडेल’बनल्याचे सांगितले. पंचायत समिती सदस्य अनिल जगताप, मधुकर भोसले, रजनी भोसले, सुनीता कांबळे, गट विकास अधिकारी माणिकराव बिचुकले, गट शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, साईनाथ वाळेकर यांनी स्वागत केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन, उपसभापती विक्रांत डोंगरे यांनी आभार मानले.

    कार्यक्रमात शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत चमकलेल्या, जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा, मार्गदर्शक शिक्षकांचा व सेवानिवृत्तीबद्दल विलास पोळ यांचा सत्कार करण्यात आला. ‘माझे घर,माझी शाळा’ या उपक्रमाच्या पत्रकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.