…तर गाव शंभर टक्के होणार कोरोनामुक्त : आमदार महेश शिंदे

    कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातून कोरोना हटविण्यासाठी आम्ही वचनबध्द असून, काडसिध्देश्‍वर कोविड हॉस्पिटल्सच्या चार युनिट्सच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आपल्याच भागात मोफत उपचार मिळणार आहेत, या युनिट्सच्या माध्यमातून असे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले.

    चिमणगाव (ता. कोरेगाव) येथे श्री. काळेश्‍वर मंदिराशेजारील सांस्कृतिक भवनामध्ये नव्याने सुरु करण्यात आलेल्या काडसिध्देश्‍वर कोविड हॉस्पिटलच्या युनिट क्र. ४ चे उद्घाटन आमदार शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रांताधिकारी ज्योती पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, कोविड टास्क फोर्सचे डॉ. राजन काळुखे, सरपंच पोपट करपे, संतोष जाधव, राहुल बर्गे, निलेश यादव, हणमंतराव जगदाळे, अनिल रोमण यांच्यासह उपस्थित होते.

    सद्यस्थितीत ३५ बेड कार्यान्वित  

    शिंदे म्हणाले, मतदारसंघातील सध्याचे चित्र पाहता, ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा उद्रेक जास्तप्रमाणात दिसून येत आहे. एक जण बाधित झाला की, तो संपूर्ण घर, परिसर आणि गाव बाधित करत असल्याचे चित्र आहे. टेस्टिंग कँपमध्ये जाणे देखील काही तरी कारण सांगून टाळले जाते. त्यातून कोरोनाचा संसर्ग झाला तरी लोक औषधोपचार घेत नाहीत. त्यामुळे चिमणगाव सारख्या भागात कोविड हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या परिसरातील बाधितांवर तातडीने येथे उपचार केले जाणार आहेत. ५० बेडचे हे हॉस्पिटल असून, सद्यस्थितीत ३५ बेड कार्यान्वित करण्यात आले असून, दहा बेड हे ऑक्सिजनयुक्त आहेत. १३ गावांसाठी हे हॉस्पिटल अहोरात्र कार्यरत राहणार आहे.

    …तर गाव शंभर टक्के कोरोनामुक्त शक्य

    शासनाने कोरोनामुक्त गाव योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठी टेस्टिंग करणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे, मात्र गावपातळीवर टेस्टिंग न करण्याची भूमिका घेतली जात आहे. टेस्टिंग न झाल्यास रुग्ण आढळणार नाहीत आणि गाव बक्षिसासाठी पात्र होईल, असा त्यांना विश्‍वास वाटत आहे, मात्र तो फार चुकीचा आहे. जास्तीत जास्त टेस्टिंग करुन रुग्णांचे निदान झाल्यास लवकरच उपचार होऊन गाव शंभर टक्के कोरोनामुक्त होणे शक्य आहे, असेही आमदार शिंदे यांनी सांगितले.