कृष्णा हॉस्पिटल कोरोना काळातील आधारवड; आठवले यांचे गौरवोद्गार

  कराड : कोरोना महामारीमध्ये लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा हॉस्पिटलने अग्रेसरपणे केले आहे. हजारो लोकांसाठी कृष्णा हॉस्पिटल आधारवड बनले आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी काढले. सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी कृष्णा हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

  कृष्णा हॉस्पिटलमध्ये आगमन होताच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी आठवले यांचे स्वागत केले. तसेच कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्टीच्या वतीने आठवले यांनी डॉ. भोसले यांचा सत्कार केला.

  रामदास आठवले म्हणाले, सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांनी लावलेले हे रोपटे आता वटवृक्ष बनले आहे, जे गोरगरीबांना आधार देत आहे. कोरोनाच्या काळात कृष्णा हॉस्पिटलमधून सुमारे सात हजार रुग्ण बरे झाले. याठिकाणी दाखल होणारे रुग्ण कुठल्याही जातीचे असो, धर्माचे असो, कोणत्याही पक्षाचे असो अथवा गरीब, कष्टकरी, मजूर किंवा मध्यमवर्गीय असो. सर्वांनाच चांगल्याप्रकारे सुविधा आणि सेवा देण्याचे काम कृष्णा रुग्णालय करत आहे. कोरोना काळात रुग्णांकडून एकही रुपया न घेता, त्यांच्यावर उपचार केले व त्यांना कोरोनामुक्त केले. त्यामुळे या संस्थेबद्दल मला नितांत आदर आहे. चांगल्या कामाला माझा नेहमीच पाठिंबा राहिला असून, केंद्रीय स्तरावर लागणाऱ्या कोणत्याही मदतीसाठी मी सदैव तयार आहे.

  याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, सचिन बनसोडे, आप्पासाहेब गायकवाड, जयवंत विरकायदे, युवराज काटरे, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, जितेंद्र पाटील, बाजीराव निकम, जयवंतदादा जगताप, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, मलकापूरचे नगरसेवक आबा सोळवंडे, बाळासाहेब घाडगे, नारायण शिंगाडे, रामभाऊ सातपुते, संजय पवार, दिगंबर वास्के, डॉ. सारिका गावडे, संतोष हिंगसे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

  बनुबाईंना अश्रू अनावर…

  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे नेतृत्व मानून काम करणाऱ्या शेरे गावच्या सामाजिक कार्यकर्त्या बनुबाई येवले यांना कृष्णा हॉस्पिटल येथे मंत्री आठवले भेटल्यावर, त्यांनी येवले यांची विचारपूस करताच बनुबाईंना अश्रू अनावर झाले. त्यांनी रडत-रडतच अतुलबाबांच्यामुळे माझा जीव वाचला, असे आठवलेंना सांगितले. आजारपणात कृष्णा हॉस्पिटल माझ्या मदतीला कायमच असते, अशी भावना यावेळी बनुबाईंनी व्यक्त करून दाखवली.