‘कृष्णा’ची प्रतिदिन गाळप क्षमता १२००० मे. टन करण्याचा निर्णय

-ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

    कराड: कृष्णा कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप वेळेत आणि अधिक चांगल्या क्षमतेने व्हावे यासाठी कारखान्याचे आधुनिकीकरण करून, कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता १२००० मे. टन करण्याचा निर्णय कृष्णा कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. तसेच कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्पाची क्षमता १६ मे. वॅटवरून ४८ मे. वॅटपर्यंत वाढविण्याचा आणि डिस्टीलरी प्रकल्पाची क्षमता ९५ केएलपीडीवरून ३०० केएलपीडीपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रतिपादन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

    कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्देशित केलेल्या आदेशानुसार योग्य ती खबरदारी घेत, ऑनलाईन पद्धतीने कारखान्याची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

    सभेला कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजीराव पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, शिवाजी पाटील, दत्तात्रय देसाई, जयवंत मोरे, विलास भंडारे, जयश्री पाटील, इंदुमती जाखले, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, दीपक पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी आदींसह मान्यवर व सभासद शेतकरी उपस्थित होते.

    डॉ. सुरेश भोसले म्हणाले, १९६०-६१ साली कारखान्याचा पहिला गळीत हंगाम झाला. कारखान्याच्या मिल्स जुन्या तंत्रज्ञानावर आधारित असल्याने व यंत्रसामुग्रीची कार्यक्षमता कमी झाल्याने त्याचा उत्पादन क्षमतेवर व उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. शिवाय सध्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसक्षेत्र वाढत आहे. शेतकऱ्यांच्या या ऊसाचे वेळेत गाळप होण्याची गरज लक्षात घेऊन, कारखान्याचे आधुनिकीकरण करत प्रतिदिन गाळप क्षमता १२००० मे.टन केली जाणार आहे. तसेच केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले जात असून, इथेनॉलची वाढती मागणी व त्याला मिळत असलेला चांगला दर पाहता, सध्याच्या डिस्टीलरी प्रकल्पाची क्षमता वाढविण्याचा निर्धार आमच्या संचालक मंडळाने केला आहे. या प्रकल्पांच्या आधुनिकीकरणामुळे कारखान्याच्या प्रगतीला चालना मिळून, त्याचा सर्वांत मोठा लाभ सभासदांना होणार आहे. गेल्या हंगामात सर्वच पातळ्यांवर कारखान्याने चांगली कामगिरी केली आहे. येत्या काळातही कारखान्यामार्फत सभासद व कामगारांच्या कल्याणासाठी विविध धोरणात्मक निर्णय घेण्याचा आमचा मानस आहे.

    दरम्यान, कारखान्याच्या सध्याच्या भागाची (शेअर्स) दर्शनी किंमत १०,००० रुपयांवरून १५,००० रुपये करण्याचा ‍ठरावही यावेळी मंजूर करून, त्याप्रमाणे कारखान्याच्या पोटनियमामध्ये दुरूस्ती करणेस मंजुरी देण्यात आली.

    दिवाळीपूर्वी उर्वरित एफआरपी देणार

    २०२०-२१ च्या गळीत हंगामासाठी कारखान्याची एफआरपी प्रतिटन ३००८ रुपये इतकी आहे. त्यापैकी आजअखेर प्रतिटन २८०० रुपये दिले असून, सभासदांच्या मागणीनुसार एफआरपीची उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी अदा करण्याची ग्वाही चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.