सरपंच परिषदेचा कंदील मोर्चा शिवतीर्थापर्यंतच

    सातारा : शासनाकडून ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या स्ट्रीट लाईटची बिले यापूर्वी भरली जात होती. परंतु, आता शासनाकडूनच गावागावातील लाईट बीले थकल्याचे दाखवून बिज बिले कट केली गेली आहेत. त्याच्या निषेधार्थ सरपंच परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील सरपंचांनी पोवई नाक्यावरुन शिष्टमंडळांने शिवतीर्थापर्यंत काढला. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी मोर्चेकऱ्यांना रोखून धरले. दरम्यान, हा मोर्चा सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आला.

    सभापती निवासच्या प्रांगणात सरपंच परिषदेचे पदाधिकारी कंदील घेवून जमले. तेथे मोर्चामध्ये सरपंच परिषदेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आपल्या गावातील स्ट्रीट लाईटचे लाईट बील पूर्वी जिल्हा परिषदेच्यामार्फत शासन भरत होते. परंतु, गेले काही वर्ष हे लाईट बील जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आलेले नाही. आता ग्रामपंचायतींनी ते बील भरावे, अशा पद्धतीचा शासनाचा आदेश आलेला आहे.

    नुकताच 15 व्या वित्त आयोगातून लाईट बील भरावे असे आदेश दिले गेले आहेत. वास्तविक 15 व्या वित्त आयोगातून लाईट बील भरले तर माझ्या गावाच उदाहरण देतो, साडे दहा लाख रुपये लाईट बील आहे. आणि पंधव्या वित्त आयोगाचा निधी आहे सहा लाख रुपये हे गणित बसत नाही. आपल्या खेड ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता 2 कोटी रुपये बिल तर वित्त आयोगाचा निधी सव्वा कोटी आहे. एवढी तफावत आहे. त्यामुळे हे लाईट बील शासनाने भरावे अन् स्ट्रीट लाईट सुरु कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

    पोलीस आले अन् मोर्चेकरी मागे फिरले

    मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णसाहेब मांजरे हे मोठ्या फौजफाटय़ासह सभापती निवासस्थानी पोहचले. तेथे शिष्टमंडळास मोर्चा काढता येणार नाही, असे सांगत सर्वांना तेथेच रोखले. तेव्हा शिष्टमंडळांनी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास अभिवादन करुन माघारी येतो अशी विनंती करताच त्यांनी मोजक्या शिष्टमंडळास तेथून सोडले. त्यांनी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करुन मोर्चातील शिष्टमंडळ सभापती निवासासमोरील मोकळय़ा जागेत आले.