पर्यटनाला बंदी असतानाही महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी; प्रशासनाचे दुर्लक्ष

  महाबळेश्वर : सातारा जिल्हा रेडझोनमध्ये असून महाबळेश्वर येथील हॉटेल व लॉजमध्ये पर्यटकांना घेण्यास बंदी आहे. परंतु असे असले तरी शहरहद्दीबाहेर असलेल्या खाजगी बंगले, लहान हॉटेल व लॉजमध्ये पर्यटकांची वर्दळ पाहावयास मिळत आहे. हेच पर्यटक महाबळेश्वरच्या बाजारपेठेतही मनसोक्त फेरफटका मारताना दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

  सातारा जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या वाढीचा दर दहा टक्क्यांपेक्षा कमी होत नसल्याने जिल्ह्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी संगिता राजापुरकर यांनी याबाबत नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार हॉटेल व लॉजमध्ये पर्यटकांना प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरातील अधिकृत हॉटेल व्यवसाय करणारे अनेक मोठी हॉटेल व लॉजेस या नियमांचे काटेकोर पालन करीत आहेत. सध्या लॉकडाउनमुळे कायम घरात राहून कंटाळलेले पुणे-मुंबईचे लोक पर्यटनासाठी बाहेर पडू पाहत आहेत. यासाठी ते हॉटेलसाठी महाबळेश्वर येथे फोन करून चौकशी करीत आहेत.

  शहरातील हॉटेल मालक हॉटेल बंद आहे असे सांगतात. परंतु शहराबाहेरील हॉटेल व लॉजमालक बेकायदेशीररित्या अशा पर्यटकांना प्रवेश देत आहेत. महाबळेश्वर पांचगणी मार्गावर मोठ्या प्रमाणावर हॉटेल व लॉज आहेत. अनेक खाजगी बंगले देखील आहेत या बंगल्यातूनही मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसाय चालतो. महाबळेश्वर तापोळा रस्ता, महाबळेश्वर प्रतापगड, महाबळेश्वर केळघर या मार्गावर देखील मोठया प्रमाणावर हॉटेल व लॉज आहेत. या ठिकाणी मोठया प्रमाणावर विनापरवाना हॉटेल व्यवसाय केला जातो. आज विकेंड असल्याने शुक्रवारपासून पर्यटकांच्या गाड्यांची वर्दळ वाढली आहे.

  शहरात नाक्यावर पालिकेच्या वतीने वाहनांची तपासणी केली जाते. ई-पास आहे का नाही याची तपासणी केली जाते. तसेच शहरात तुम्हाला राहता येणार नाही याची कल्पना दिली जाते. म्हणून अनेक पर्यटक शहरात न येता शहराबाहेर असलेल्या खाजगी बंगल्यात व काही लहान हॉटेल, लॉजमध्ये राहणे पसंत करतात. या ठिकाणी कोणी तपासणी करीत नसल्याने बिनदिक्कत पर्यटकांची तीन-चार दिवसांची सहल यशस्वी होते. प्रशासनाच्या नजरेतून वाचविण्यासाठी पर्यटकांना जादा आकार द्यावा लागतो.

  लॉकडाउनमुळे कंटाळलेले पर्यटक ज्यादा दर देऊन सर्व सुखसोयींचा उपभोग घेत आहेत. तालुका प्रशासनाने यासाठी तालुक्यातील अशा ठिकाणी छापा मारून विनापरवाना पर्यटकांना हॉटेल, लॉजमध्ये प्रवेश देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

  शासनाचे नियम पाळून अनेकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. परंतु विनापरवाना धंदा करणांऱ्यांनी लॉकडाउनमध्येही धंदा सुरु ठेवला आहे. अशाप्रकारे नियम मोडणाऱ्यांना तालुका प्रशासन अद्द्ल घडविणार की नाही याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.