स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार सहकारमंत्र्यांना आहे का?; राजू शेट्टी यांचा बाळासाहेब पाटील यांना खोचक सवाल

ज्यांनी या महाराष्ट्रात सहकार वाढवला व रूजवला त्या स्वर्गीय चव्हाण साहेबांना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार सहकार मंत्र्यांना आहे का ते त्यांनी तपासून पहावे, कारण राज्यातील शेतकऱ्यांना एफआरपी मिळवून देण्याची जबाबदारी सहकार मंत्र्यांचे असताना त्यांच्याच नेतृत्वाखालील सह्याद्री कारखान्याने एफआरपी दिलेली नाही

  कराड : स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रात सहकार रुजवला, वाढवला त्या स्व. चव्हाण साहेबांना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार राज्याच्या सहकार मंत्र्यांना आहे का असा खरमरीत सवाल करून २२ मार्च रोजी सह्याद्री सहकारी कारखान्यावर थकीत एफआरपी साठी बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज कराड येथे दिला.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंती निमित्त येथील त्यांच्या समाधीस्थळावर अभिवादन केल्यानंतर माजी खा. राजू शेट्टी पत्रकारांशी बोलत होते.

  ते म्हणाले, राज्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे कबूल केले मात्र केवळ तीन चार साखर कारखान्यांनी आपला शब्द फिरवत पंचवीसशे रुपयांचा भरणा केला तर राज्यातील अन्य कारखान्यांनी एफआरपी दिलाच नाही, याबाबत सातत्याने साखर आयुक्ताकडे पाठपुरावा करत होतो, शिवाय त्यांना भेटून आंदोलनाचा इशाराही दिला होता व या एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई ची मागणी केली होती. त्यानंतर साखर आयुक्तालयाला घेराव घालून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर साखर आयुक्तांनी राज्यातील साखर कारखानदारांना कायदेशीर नोटिसा दिल्या. त्यातील १३ साखर कारखान्यांनी एफआरपीच्या ६० टक्के रक्कम थकीत ठेवली तर काहींनी ४० टक्के पेक्षा जास्त रक्कम थकीत ठेवली त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे.

  राज्यातील शेतकर्‍यांची एफआरपी थकवणारे कारखानदार हे सरकारचे थकबाकीदार समजले जातात.त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार येतोच कसा असा सवाल करून शेट्टी म्हणाले साखर आयूक्त व सहकार मंत्र्यांनी आमच्यावर अन्याय केल्यास त्यांना आम्ही न्यायालयात खेचल्या शिवाय गप्प बसणार नाही.

  ज्यांनी या महाराष्ट्रात सहकार वाढवला व रूजवला त्या स्वर्गीय चव्हाण साहेबांना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार सहकार मंत्र्यांना आहे का ते त्यांनी तपासून पहावे, कारण राज्यातील शेतकऱ्यांना एफआरपी मिळवून देण्याची जबाबदारी सहकार मंत्र्यांचे असताना त्यांच्याच नेतृत्वाखालील सह्याद्री कारखान्याने एफआरपी दिलेली नाही. आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिवादन करून साकडे घातले की सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना सुबुद्धी सुचावी व स्वर्गीय पी डी पाटील यांना देखील याबाबत साकडे घालण्याची वेळ सहकार मंत्र्यांनी आमच्यावर आणू नये एवढीच आमची अपेक्षा असल्याचे शेट्टी यांनी शेवटी सांगितले.

  वीज तोडणाऱ्यांना पिटाळून लावा

  अधिवेशन काळात विरोधकांनी वीजबिलाचा मुद्दा उचलून धरला. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुढील निर्णय होत नाही तोवर वीज तोडणी थांबवण्याचे आदेश दिले. आता अधिवेशन संपले आणि पुन्हा एकदा थकबाकीदारांची विज कट करण्याचा सपाटा लावला आहे. आता लोकांनीच हे आंदोलन आपल्या हातात घ्यावे. वीज तोडण्यासाठी जर गावात वायरमेन आला, तर गावकऱ्यांनी एकत्र येत त्याला गावातून पिटाळून लावावे. गावकरांच्या पाठीशी स्वाभिमानी शेतकरी संघटना खांद्याला खांदा लावून उभी आहे, असेही राजूशेट्टी यांनी सांगितले.