वैरण काढायला गेलेल्या शेतकऱ्याला शेतात दिसला बिबट्या तेही मृतावस्थेत; बेलवडे बुद्रुकमधील घटना

बिबट्याचा हा सुमारेेे तीन वर्षांचा बछडा असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते.

    कराड : बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथे बिबट्याचा मृत्यूू झाल्याची घटना बुधवारी सकाळी समोर आली. बिबट्याचा हा सुमारेेे तीन वर्षांचा बछडा असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. याबाबतची वनविभागाला कळविण्यात आली आहे.

    याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील नावाच्या शिवारात बुधवारी सकाळी 10 वाजता उसाच्या शेतात वैरण काढायला गेलेल्या शेतकऱ्याला शेतात बिबट्या मृतावस्थेत पडला असल्याचे दिसून आले. शिवाजी बाळासो पवार (रा. बेलवडे बुद्रुक ता. कराड) असे शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ ग्रामस्थांना दिली. त्यानंतर बिबट्याला पाहण्यासाठी शिवारात लोकांची मोठी गर्दी झाली होती. बिबट्याचा मृत्यू हा दोन-तीन दिवसांपूर्वी झाला असल्याचा प्राथमिक अंदाज असून परिसरात दुर्गंधी सुटल्याने त्याठिकाणी पाहिले असता शेतकऱ्याच्या ही बाब निदर्शनास आली.

    दरम्यान, याबाबतची माहिती वन विभागाला कळविण्यात आली आहे. बेलवडे बुद्रुकसह आसपासच्या गावांमध्ये काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिक ग्रामस्थांना निदर्शनास आले होते. तसेच काही दिवसांपूर्वीच बेलवडेमध्ये शेतातील वस्तीवर बिबट्याने हल्ला करून कुत्रे फस्त केल्याची घटना घडली होती. या परिसरात वारंवार बिबट्याचे होणारे हल्ले व ग्रामस्थांना प्रत्यक्ष बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने यावर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बेलवडेसह कासारशिरंबे, मालखेड, कालवडे, कासेगाव, वाठार ग्रामस्थांकडून होत आहे.