कोरोनाने मृत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबाना मदत करु; डॉ. राजू पाटोदकर यांची ग्वाही

    सातारा : मराठी पत्रकार परिषदेच्या सातारा जिल्हा पत्रकार संघाने सुचवल्या नुसार सातारा जिल्ह्यातील कोरोनाने मृत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबाना केंद्र सरकारच्या पीआयबी मार्फत मदत करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करु,जेष्ठ पत्रकारांच्या पेन्शन योजनेच्या प्रलंबित प्रश्नाचा तातडीने निपटारा करु, ग्रामीण भागातील पत्रकांराना आधिस्वीकृती कार्ड कसे देता येईल याचा पाठपुरावा करु,अशी ग्वाही नूतन पुणे विभागिय माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर (Dr. Raju Patodkar) यांनी दिली.

    सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने येथील जिल्हा माहिती कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्या नंतर आयोजीत बैठकीत डॉ. पाटोदकर बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, जिवनधर चव्हाण, ओंकार कदम,अमित वाघमारे, भाऊ चिंचकर,विकास धुळेकर उपस्थित होते.

    हरीष पाटणे म्हणाले की, कोरोना कालावधीत जिल्ह्यातील मृत्यू पावलेल्या पत्रकारांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसे जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा पत्रकार संघाने पत्र दिले आहे. मात्र अद्याप त्यावर काहीच झाले नाही, त्यांच्या कुटूंबियांना धीर देण्यासाठी यावर तत्काळ निर्णय घेतला जावा, राज्य व केंद्र शासनाच्या योजनांमधून ही मदत मिळावी, जेष्ठ पत्रकारांना पेन्शन योजना लागू करण्यास विलंब होत आहे.

    त्याबाबतही सकारात्मक भूमिका घेउन राज्य शासनाकडे या बाबत पाठपुरावा व्हावा, ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृतीची खरी गरज आहे. त्यामुळे अधिस्वीकृती निकषांमध्ये योग्य ते बदल करून जास्तीत जास्त पत्रकारांना त्याचा लाभ होण्यासाठी निर्णय घेतला जावा असे सुचवले. यावर डॉ पाटोदकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व विषयांमध्ये आपण स्वतः लक्ष घालणार असल्याची ग्वाही दिली.

    पाटोदकर म्हणाले की, पत्रकारितेतूनच आपले करिअर सुरू झाल्याने त्यांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव आहे. सातारा जिल्ह्यातील पत्रकार संवेदनशील असल्याची आपणाला माहिती आहे. जिल्हा पत्रकार संघाचे घेतलेली भूमिका निश्चित चांगली आहे, प्रशासनाला पूरक असे काम येथील मीडियाचे आहे. त्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यास आपला प्राधान्यक्रम राहील, असेही पाटोदकर यांनी सांगितले.