‘ईडी’ला साताऱ्यातील शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ; आमदार शशिकांत शिंदेंचा इशारा

    सातारा : जरंडेश्वर साखर कारखाना हा शेतकरी हिताचा निर्णय घेणारा महाराष्ट्रातील एकमेव कारखाना ठरला आहे. सर्वच बाबतीत अग्रेसर असलेल्या या कारखान्यावर जाणीवपूर्वक राजकीय हेतूने ईडीमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. कारखाना चालू राहिला तर, 50 हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे. कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी शांत बसणार नाहीत. ईडीने राजकीय खेळातून जरंडेश्वर कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यास ईडीला सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ताकद निश्चितपणे दाखवून देणार आहे, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.

    कोरेगाव तालुक्यातील वडाचीवाडी येथील सह्याद्री मंगल कार्यालयात जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मंगेश धुमाळ, राजाभाऊ जगदाळे, बाळासाहेब सोळस्कर-पाटील, किरण साबळे पाटील, संदीप मांडवे, प्रा. बंडा गोडसे, शिवाजीराव महाडिक, राजेंद्र मोसले, रमेश उबाळे, संजय पिसाळ, पै.सागर साळुंखे, सुरेखा पाटील, प्रतिभा बर्गे उपस्थित होते.

    आमदार शिंदे म्हणाले, जरंडेश्वर कारखाना 2010 सालापर्यंत 2500 मेट्रिक टन क्षमतेचा होता. आज हा कारखाना 10 हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त क्षमतेने चालत असून, वीज निर्मितीसह डिस्टिलरीची उभारणी केली आहे. आज कारखान्याच्या माध्यमातून हजारो रोजगार तयार झाले आहेत. 50 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात उच्चांकी दर देणारा आणि वेळेवर पेमेंट करणारा हा कारखाना असल्याने शेतकरी त्यालाच ऊस घालत आहेत. राजकीय द्वेषातून हा कारखाना बंद पाडण्याचा कोणी प्रयत्न करत असेल. तर शेतकरी ते खपवून घेणार नाहीत. शेतकऱ्यांची ताकद काय असते, हे ईडीला दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी दिला.

    सुनील माने म्हणाले, ‘आजवर वेगवेगळ्या पक्षाची सरकारे केंद्रात होती. त्यांनी कधीही शेतकऱ्यांविषयी राजकारण केले नाही. त्यांना शेतकऱ्यांविषयी आस्था होती. आज केंद्रात असलेले भाजपचे सरकार ईडीचा वापर करून भाजप वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही 41 कारखान्यांची तक्रार केली आहे. मग एकट्या जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई का केली. त्याबाबत भाजप का बोलत नाही ? आता शांत बसून चालणार नाही, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी लढा उभारला जाणार असून, त्या माध्यमातून ईडीला धडा शिकवू, असा इशारा त्यांनी दिला.