…इथं निर्बंध फक्त नावालाच; मद्याच्या दुकानाचं शटर डाऊन, पण विक्री तूफान

    सातारा : कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली. तसेच काही शर्थी व अटींवर अत्यावश्यक सेवेतील दुकानांना वेळेची मर्यादा घालून सुरु ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र, गरीब दुकानदार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करताना दिसून येत असले तरी अनुज्ञप्ती तथा दारु विक्री दुकानदारांनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

    गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनबाबत जिल्हा प्रशासन, व्यापारी आणि नागरिकांमध्ये उघडझापचा लपंडाव सुरु आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने वाढत आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लॉकडाऊनमध्ये सरळ सूट न देता काही अटी व शर्थींवर सातारा जिल्हा अनलॉक करण्याबाबत आदेश दिले असून, सध्या सकाळी 9 ते 2 जिल्ह्यातील जीवनावश्यक तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. तथापि, हॉटेल्स व तत्सम संस्थांना पार्सल व घरपोच सेवेची सुविधा देण्यास मान्यता दिली आहे.

    जिल्ह्यातील अनुज्ञप्ती अर्थात देशी व विदेशी दारु विक्री दुकानांना जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत होम डिलिव्हरी या निकषावर विक्रीची परवानगी दिली आहे. मात्र, दारुविक्री दुकानदारांकडून या आदेशाला हरताळ फासला जात आहे. वाढे फाटा परिसरात असलेल्या गोल्डन वाईन शॉप हा अनुज्ञप्तीधारक सकाळी 7 ते संध्याकाळी उशिरापर्यंत दुकानाचे अर्धे शटर उघडे ठेवून लोकांना दारुविक्री करीत आहे. दुकानाच्या पुढ्यातच मोठमोठ्या बॉक्समध्ये विविध प्रकारच्या मद्यांच्या बाटल्या विक्रीस ठेवल्याने याठिकाणी दारु खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तळीरामांची गर्दी होत आहे. त्यामुळे वाढे फाटा परिसरात मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम होत आहे.

    वाहतूक कोंडी होतीये

    पुणे – सातारा महामार्गालगत हे गोल्डन वाईन शॉप असल्याने अनेक तळीराम आपली दुचाकी व चारचाकी वाहने सेवा रस्त्यावरच पार्क करीत असल्याने याठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.