देशातील सर्वात सुंदर स्वच्छ हिलस्टेशन म्हणून महाबळेश्वर नावारूपास येईल : जिल्हाधिकारी शेखर सिंह

    महाबळेश्वर : हिलदारीच्या मदतीने देशातील सर्वात स्वच्छ व सुंदर हिलस्टेशन म्हणून महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ नावारूपास येईल, असा विश्वास सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केला. तसेच शहरातील विविध सेवाभावी संस्था संघटना व नागरिकांनी या प्रकल्पास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केेले.

    जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हिलदारी व गिरिस्थान नगर परिषद यांच्या संयुक्त विदयमाने येथील हिरडा विश्रामगृहावर जिल्हाधिकारी शेखर सिह यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी विनय गौड, प्रांताधिकारी संगिता राजापूरकर, तहसीलदार रणजितसिह भोसले, पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी, पंचायत समितीचे सभापती व उपनगराध्यक्ष अफजल सुतार हे उपस्थित होते.

    महाबळेश्वरला निसर्गाचे वरदान लाभले आहे. मात्र, मानवनिर्मित कचऱ्यामुळे आपल्या या सुंदर पर्यटनस्थळाची प्रतिमा मलिन होते. ही प्रतिमा सुधारण्यासाठी पुढील तीन वर्षे हिलदारी ही संस्था येथे घनकचरा व्यवस्थापनाचे काम पाहणार आहे. देशातील अनेक हिलस्टेशनवर या संस्थेने काम केले आहे. पांचगणीपेक्षा महाबळेश्वर येथील स्वच्छतेची स्थिती अधिक खराब आहे. म्हणून येथे काम करण्याची गरज आहे. आपण कचरा व त्याची विल्हेवाट यासाठी दरवर्षी लाखो रूपये खर्च करतो. तरी आपल्या स्थितीत सुधारण होत नाही. आजही कचरा डेपोवर कचऱ्याचे डोंगर उभे आहेत.

    कोकणातील वेंगुर्ले येथील कचरा डेपोवर बगीचा फुलविला आहे. अशाप्रकारे काम करण्याची गरज आहे. हिलदारी या संस्थेला नागरिकांचे सहकार्य मिळाले तरच महाबळेश्वर हे सुंदर व स्वच्छ शहर म्हणून उदयास येईल. यासाठी शहरातील विविध सेवाभावी संस्था संघटना लोकप्रतिनिधी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

    यापूर्वी आपण ओला आणि सुका असे दोन प्रकारचे वर्गीकरण करत होतो. आता चार प्रकारात वर्गीकरण करावे लागणार आहे. जो असे वर्गीकरण करणार नाही, अशा संस्था व कुटुंबावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद पालिकेने आपल्या नियमावलीत करावी. केवळ आपले शहर स्वच्छ करून आपली प्रतिमा सुधारणार नाही. तर महाबळेश्वर व पांचगणी या दोन शहराजवळ असलेली लहान-लहान गावेही स्वच्छ झाली पाहिजे.

    पालिकेने जवळच्या खेड्यातील कचरा कसा गोळा करायचा त्याबाबत निर्णय घ्यावा. महाबळेश्वर सुंदर आणि स्वच्छ म्हणून नावारूपास येण्यासाठी पालिका महसूल व वन यांची भूमिका देखील महत्वाची ठरणार आहे. या तीनही विभागात समन्वय आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.