साताऱ्यातील ‘या’ गावात माळीणसदृश्य परिस्थिती; रस्ता खचला, पाच गावांचा संपर्कही तुटला

    सातारा : सातारा तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अद्यापही पडझड सुरूच असून, बोंडारवाडी येथे माळीण सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरात असणाऱ्या पळसावडे जलाशय नजीकचा रस्ता असल्यामुळे पाच गावांचा संपर्क तुटला असल्याची माहिती सरपंच दिलीप जाधव यांनी दिली.

    आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बोंडारवाडी येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पडझडीचे पंचनामे करून गावात निर्माण झालेल्या परिस्थितीचे निराकरण करावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना आलेल्या महापुरामुळे आणेवाडी, ता. सातारा येथील टोल नाक्यावर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून २५० ट्रक थांबवून ठेवले आहेत.

    सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने बुधवारपासून हाहाकार उडवून दिला आहे. सातारा शहरासह तालुक्यात सर्वदूर पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. सातारा शहरानजीक असणाऱ्या यवतेश्वर घाटात दरड कोसळली होती. सांडवली, ता. सातारा येथे रस्ता खचून परिसरातील गावांचा संपर्क तुटला असतानाच बोंडारवाडी, ता. सातारा परिसरात असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नजीकच असणाऱ्या पळसावडे जलाशयाजवळील रस्ता संपूर्णपणे खचून गेल्यामुळे परिसरातील मोरगड सांडवली पळसावडेसह पाच गावांचा संपर्क तुटला आहे.

    घरांमध्ये पाणीच पाणी

    बोंडारवाडी येथे चिखल आणि पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले असून पाच घरांमध्ये पाणी शिरून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. गावामध्ये माळीण सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुलाब जाधव, बाळू जाधव, परशुराम जाधव, किरण जाधव, किसन जाधव यांच्या घरामध्ये पाणी शिरले असल्याची माहिती सरपंच दिलीप जाधव यांनी दिली.

    शिवेंद्रसिंहराजेंकडून पाहणी

    या घटनेची माहिती मिळताच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बोंडारवाडी येथे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी नागरिकांना दिलासा देत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देत गावातील पडझडीचे तात्काळ पंचनामे करून डागडुजी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.