वाठार बुद्रुकमधील घातपाताचा छडा; येरवडा कारागृहात झालेल्या वादातूनच मंगेश पोमणची हत्या

    अरडगाव (प्रतिनिधी) : वाठार बुद्रुक गावच्या हद्दीत मंगेश सुरेंद्र पोमण याचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला होता. या खुनाचा छडा लागला असून, येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना झालेल्या वादातून दोघांनी खून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी वैभव सुभाष जगताप (वय २८ रा. पांगारे, ता. पुरंदर) यास अटक केली आहे तर ऋषीकेश दत्तात्रय पायगुडे (रा. कुडजे, ता. हवेली, जि. पुणे) हा फरार असून पोलिस शोध घेत आहेत.

    याबाबत माहिती अशी, ८ रोजी वाठार बुद्रुक, ता. खंडाळा गावच्या हद्दीत नीरा उजवा कॅनॉलमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह मिळून आला होता. या घटनेची लोणंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. तपासमध्ये मयत मंगेश सुरेंद्र पोमण (वय ३५ वर्षे रा. पोमणनगर पिंपळे, ता. पुरंदर) याचा खून करून मृतदेहावरील कपडे काढून ते फेकून देऊन पुरावा नाहीसा केल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत लोणंद पोलीस ठाण्यास खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.

    घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी तपासाबाबत योग्य त्या सूचना दिल्या. तपास चालू असताना तानाजी बरडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल के. वायकर, गुन्हे प्रकटीकरण विभाग लोणंद यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपीची नावे निष्पन्न करुन संशयित वैभव सुभाष जगताप याचा ठावठिकाणा काढला. तो सध्या पांगारे येथे असल्याची माहिती प्राप्त होताच त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले असता त्याने गावातून मोटार सायकलवरुन पळ काढला. विशाल वायकर व पोलीस पथकाने फिल्मी स्टाईलने डोंगराळ परीसरात त्याचा पाठलाग करुन संशयितास जेरबंद केले. त्याची चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु लागला.

    इंट्रोगेशन स्किलचा वापर करुन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी खून कसा व कोठे केला हे निष्पन्न केले आहे. तपासामध्ये आरोपी, त्याचा साथीदार व मयत हे येरवडा जेल येथे शिक्षा भोगत असताना झालेल्या वादावरून खुन केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यातील आरोपींनी खुनाच्या गुन्ह्यात येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगली आहे. या क्लिष्ट स्वरुपाचा खुनाचा गंभीर गुन्हा कोणताही स्वरुपाचा आरोपीपर्यंत पोहचण्याचा धागादोरा नसताना उघडकीस आणला आहे.

    संशयितास खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, तपास विशाल के. वायकर करत आहेत. ही कारवाई घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेप्रमाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल के. वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, सहा. फौजदार शौकत सिकिलकर, देवेंद्र पाडवी, पो. अंमलदार महेश सपकाळ, अंकुश इवरे, अविनाश नलवडे, संतोष नाळे, ज्ञानेश्‍वर मुळीक, श्रीनाथ कदम, अभिजीत घनवट, सागर धेंडे, अविनाश शिंदे, विठ्ठल काळे, फैयाज शेख, अमोल पवार, शशिकांत गार्डी, गोविंद आंधळे, केतन लाळगे, महीला पोलीस अंमलदार प्रिया दुरगुडे, चालक मल्हारी भिसे, शिंदे यांनी केली.