वाईतील मराठा समाजाचा संभाजीराजेंना पाठिंबा

    वाई : मराठा क्रांती मोर्चा वाई तालुका यांच्या वतीने वाई प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वाई प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

    या निवेदनात म्हटले आहे की, गेली अनेक वर्षे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन निवेदन मोर्चा आदी लोकशाही मार्गाने प्रयत्न केले आहेत. मात्र, केलेल्या मागणीला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. मराठा समाजातील अनेक तरुण, मुलं-मुली पात्रता असूनही आरक्षणाअभावी नोकरीपासून वंचित राहत आहेत. कोल्हापूर येथे संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील मराठा समाजाचे आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्या आंदोलनाला वाई तालुक्याच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.

    मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करून मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समस्त मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. यावेळी यशराज भोसले, चरण गायकवाड, काशिनाथ शेलार, प्रदीप कदम, किरण खामकर, गजानन भोसले, सचिन घाडगे यांसह आदी मराठा समाजाचे स्वयंसेवक उपस्थित होते.