अटलजींचा सुसंस्कृतपणा आत्मसात करा मगच जीभ टाळ्याला लावा; नगराध्यक्ष कदम यांचे नगरसेविका पवार यांच्यावर शरसंधान

    सातारा : बांधकाम सभापती सिध्दी पवार यांच्या वॉर्डात खासदार उदयनराजे भोसले यांच्या आदेशाप्रमाणे २ कोटी ३६ लाख ५६ हजार रुपयांची ३७ विकासकामे करण्यात आली आहेत. सिध्दी पवार ज्या अटल स्मृती उद्यानावरून राजीनामा देण्याच्या गोष्टी करत आहेत, ती योजना नगरोत्थान अंर्तगत प्रस्तावित करण्यात आली आहे. स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नखाएवढा सुसंस्कृतपणा तरी अंगी बाळगा आणि मग जीभ टाळ्याला लावा, असा उपरोधिक टोला नगराध्यक्ष माधवी कदम यांनी बांधकाम सभापती सिध्दी पवार यांना लगावला.

    बुधवार उजाडला तरी राजीनामा नाही

    नगराध्यक्ष माधवी कदम यांनी पुढे नमूद केले आहे की, मी स्वार्थासाठी खुर्चीला चिटकून राहत नाही असे म्हणणाऱ्यांचा राजीनामा बुधवार उजाडला तरी आलेला नाही. बांधकाम सभापतींचे आरोप तथ्यहीन असून, त्यांनी केलेला त्रागा त्यांच्या मूळ संस्कृतीचे दर्शन घडविणारा आहे. सातारकरांना त्यांच्या बुध्दिमत्तेचा स्तर समजला आहे. पवार यांच्या वॉर्डात खासदार उदयनराजे भोसले यांनी २ कोटी ३६ लाख ५६ हजार रुपयांची ३७ कामे मंजूर केली आहेत. काही कामे पूर्ण तर काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्यांच्या वॉर्डात कामे होत नाही, हा सिध्दी पवार यांचा आरोप हास्यास्पद असल्याची टीका नगराध्यक्ष माधवी कदम यांनी केली आहे.

    जलतरण तलावासाठी ४ कोटींचे अंदाजपत्रक

    त्यांच्या वॉर्डातील अटल स्मृती उद्यानाचे काम नगरोत्थान योजनेत गतवर्षीच प्रस्तावित केले असून, त्यांची मंजूरी प्राप्त होताच कामाला सुरूवात केली जाणार आहे. तसेच सातारा शहरात महिलांसाठी सात ठिकाणी ‘पे अँड यूज टॉयलेट’च्या कामाला मंजूरी देण्यात आली. हा खर्च पालिकेच्या जनरल फंडातून केला जाणार आहे. तसेच सातारा शहरातील पालिकेच्या मालकीच्या जलतरण तलावाचे ४ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

    १ कोटी ८५ लाखांची कामे प्रस्तावित

    सिध्दी पवार यांच्या वॉर्डात एकूण ३७ पैकी ५१ लाख ३४ हजार रूपयांची २० कामे पूर्ण झाली आहेत. १ कोटी ८५ लाख रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. स्वतःच्या राजीनाम्याची खासदार उदयनराजे भोसले यांच्या तत्कालीन लोकसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्याशी तुलना करत आहे. त्यांची ही तुलना म्हणजे कुठे इंद्राचा ऐरावत कुठे शामभट्टाची तट्टाणी असाच प्रकार आहे. सातारा परिषदेत कोणीही जादू करत नाही, उदयनराजे यांनी केलेल्या विकासकामांची जादू नक्कीच आहे, असे पत्रकात पुढे नमूद आहे .