आमदार महेश शिंदे व उद्योजक नितीन चव्हाण यांच्यात भेट; राजकीय चर्चाँना उधाण

    वाठार स्टेशन : कोरेगाव-खटावचे आमदार महेश शिंदे हे सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. कोरोना काळातील त्यांचे कार्य असो की विकासकामांचा धडाका असो, तसेच आपल्या शैलीतील त्यांचे भाषण असो, आता चक्क त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना चार्जिंग करण्याचा कार्यक्रम आखला आहे.

    आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची बांधणीची चर्चा जोर धरू लागली आहे. तसं पाहिलं तर राज्यावर सत्ता महाविकास आघाडीची असली तरी सातारा जिल्ह्यात मात्र दोन्ही पक्ष एकत्र येतील असा कोणताच योग मतदारसंघात दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यातच आता वाठार स्टेशन पंचक्रोशीतील राजकारण पाहता याही मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी आमदार महेश शिंदे ताकद लावणार असल्याची चर्चा होत आहे.

    रविवारी वाठार स्टेशन येथील युवा उद्योजक नितीन चव्हाण यांच्या निवासस्थानी तब्बल अर्धा तास या मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा झाली असल्याचे समजत आहे. त्यामुळे पुढे जावून या दोन्ही मतदारसंघातील राजकारण कोणते वळण घेईल व कोणाला सत्ता देईल हे तर आगामी काळ व जनताच ठरवेल.