माण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी नेतेमंडळींच्या बैठका सुरु

  म्हसवड : राज्यातील मार्केट कमिटीच्या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने माण तालुक्यातील नेते मंडळींनी बैठकांचा सपाटा लावला आहे. अनेकांची वेगवेगळी खलबते सुरु झाल्याने यंदाची मार्केट कमिटीची निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.

  माण तालुका कृषी उत्पन्न समितीवर सध्या आमदार जयकुमार गोरे यांचे वर्चस्व असून, या समितीची गेल्यावेळी चिठ्ठीवर चेअरमन निवड होऊन चिठ्ठीमुळे आमदार गोरे यांच्या गटाची सत्ता या ठिकाणी आली आहे. तर त्यांचे बंधू असलेले शेखर गोरे यांचे सदस्य सध्या विरोधी बाकावर दिसत असले तरी ५ वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहिल्याने यंदाची होणारी मार्केट कमिटीची निवडणूक रंगतदार होण्याची चर्चा आहे. या निवडणुकीसाठी मैदानात कोण असणार यासोबतच आमचं ठरणार की विस्कटणार याकडे मतदारांसह जनतेचे लक्ष लागले आहे.

  बाजार समितीचे एकूण २०६५ मतदार १८ संचालक निवडून देणार आहेत. यात हमाल मापडी मतदा २०६५ मतदार ठरवणार १८ संचालक, हमाल तोलाईसाठी एकच मतदारसंघात फक्त एकच मतदार आहे. सोसायटी मतदारसंघातून ८९५ मतदार ११ संचालक निवडून देणार आहेत. त्यातील सात जागा खुल्या प्रवर्गासाठी दोन जागा महिलांसाठी इतर मागास प्रवर्गासाठी एक तर विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी एक जागा आरक्षित आहे. ग्रामपंचायत मतदार संघातून ८३५ मतदार ४ संचालक निवडून देणार आहेत. व्यापारी आडते मतदार संघातून ३३४ मतदार २ संचालक निवडून देणार आहेत. तर हमाल तोलाई मतदारसंघातून एक संचालक निवडून द्यावयाचा असून, त्यासाठी फक्त एकच मतदार आहे.

  मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 9, आमदार जयकुमार गोरे गटाने ६ तर अनिल देसाई गटाचे ३ संचालक निवडून आले होते. अनिल देसाई यांनी आमदार गोरेंना साथ दिल्यामुळे समसमान बलाबल झाले होते. अध्यक्षपदाची निवड चिट्ठीवर होऊन आमदार गोरे गटाच्या अरुण गोरेंना नशीबाने साथ दिली होती. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले. मित्र शत्रू झाले तर शत्रू मित्र झाले, अनेकांच्या राजकीय भूमिका पक्ष बदलले आहेत अशा परिस्थितीत आमदार गोरे यांनी आपले डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे.

  तोट्यात असलेल्या समितीला म्हसवडमुळे मोठा आधार

  बाजार समितीचे मुख्य कार्यालय दहिवडी येथे असले तरी या समितीमध्ये व्यापारी वर्गातून निवडून आलेले म्हसवडचे संचालक कैलास भोरे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन म्हसवड येथील बाजार समितीच्या जागेत ३० व्यापारी गाळे उभारले आहेत. तर आणखी ४५ व्यापारी गाळे नियोजित असून, त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. तर उभारलेल्या या व्यापारी संकुलनातून बाजार समितीला दरमहा मोठे उत्पन्न सुरु झाले आहे. याशिवाय या संकुलनामुळे अनेक सभासदांना येथे व्यापार सुरु करण्यास मदत झाली आहे.