पशुसंवर्धन विभागाच्या योजनांपासून सदस्यच अनभिज्ञ!

सभापती प्रणव ताटे यांनी मांडले वास्तव : पाण्यापासून वंचित वस्त्यांवरही घर तेथे नळ कनेक्शन पोचावा

  कराड : कराड तालुक्याचा पशुसंवर्धन विभागाकडून नेमकी काय कामे केली जात आहेत, याबाबतचा प्रश्न सभापती प्रणव ताटे यांनी मासिक सभेत उपस्थित केला. याबाबत पंचायत समिती सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी व सदस्यांना माहिती दिली जात नाही. त्यामुळे सदर विभागाकडून कधी व कोणत्या योजना राबवल्या जातात की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. या विभागाच्या विविध योजनांपासून पंचायत समिती सदस्यच अनभिज्ञ असल्याचे वास्तव सभापती प्रणव ताटे यांनी मांडले.

  पंचायत समितीच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित पंचायत समितीच्या मासिक सभेत ते बोलत होते. यावेळी उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेत विविध विभागाच्या प्रमुखांनी आढावा सादर केला. यावेळी पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पशूसंवर्धन विभागाचा आढावा सादर करताना त्यांनी तालुक्यात लाळखुरकत लसीकरण सुरु झाल्याचे सांगितले. यावर सभापती ताटे यांनी लाळखुरकत लसीकरण कधी सुरु झाले? त्याबाबत आपल्या विभागाकडून कोणाला माहिती देण्यात आली? सदस्यांना त्याबाबतची माहिती का देण्यात आली नाही? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसेच जिल्ह्याच्या इतर तालुक्यांमध्ये लसीकरण कसे राबविले जाते! याची आपणास माहिती देऊ का? असेही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले.

  यावर पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरचे लसीकरण नुकतेच सुरु करण्यात आले असून त्याच्या कार्यक्रमांसाठी त्या-त्या विभागातील सदस्यांना बोलविण्याची सूचना सर्व पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात येईल, असे सांगितले. परंतु, कार्यक्रम आधी राबविला जातो, आणि नंतर सदस्यांना त्याबाबतची माहिती दिली जाते, हे असेच चालू आहे. त्यामुळे त्यालीक्यात पशूसंवर्धन विभाग आहे तरी का? असा प्रश्न सर्वांनाच पडला असल्याचे सभापती ताटे यांनी सांगत यापुढे सदरच्या चुका सुधारून घ्या, अशा कानपिचक्याही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

  दरम्यान, जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. तसेच जिल्हा परिषद सदस्यांनी शिफारस केलेली काही प्रकरणे मंजूर झाली असून संबंधित लाभार्थ्यांना त्याची खरेदी करण्याची पत्रे दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सेसमधून ५ शेळ्या व एक बोकड योजना मिळण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांची शिफारस लागते. परंतु, त्यांच्या गटात दोन पंचायत समिती सदस्यही असून त्यानाही प्रत्येकी एकेक शिफारस करता यावी, हा मुद्दा विचारात घेण्याबाबत संबंधितांकडे पाठपुरावा कराव, अशी सुचनाही पोळ यांनी यावेळी केली.

  पिण्याच्या पाण्यापासून वंचित वस्त्यांचा शोध घ्या…
  पाणीपुरवठा विभागाचा आढावा सादर करण्यात आला. यावेळी सदस्य सुहास बोराटे यांनी प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्यापासून वंचित असलेल्या वस्त्यांचा शोध घेवून घर तेथे नळ कनेक्शन मिळण्यासाठी ग्रामसेवकांची मिटींग बोलविण्याची मागणी केली. त्यावर उपसभापती देशमुख यांनीही कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.

  पाणी स्रोत वेळेवर तपासवेत
  आरोग्य विभागाचा आढावा डॉ. सुनिल कोरबू यांनी सादर केला. यावेळी आरोग्य विभागाने तालुक्यातील गावनिहाय पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासणी वेळेत व काटेकोर करावी, अशी सूचना उपसभापती देशमुख यांनी केली. त्यानुसार सदरची तपासणी काटेकोरपणे करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. कोरबू यांनी दिले.