म्हसवड शहरात ८ दिवसातून होतोय पाणीपुरवठा

    म्हसवड : माण तालुक्यातील सर्वात मोठे शहर म्हणून म्हसवडची ओळख आहे. या शहराची पालिकाही सर्वात जुनी आहे, शहराला ऐतिहासिक वारसा असल्याने शहरासाठी जीवन प्राधिकरण विभागाची वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे, असे असतानासुध्दा म्हसवड शहरात ८ ते ९ दिवसातून एकवेळ पालिकेकडून पाणी पुरवठा सुरु आहे. यामुळे म्हसवडकर जनता खूपच वैतागली असून, पाण्यासाठी पालिकेने सुरु केलेली नागरिकांची हेळसांड न थांबल्यास पालिकाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा म्हसवडकर जनतेतून दिला जात आहे.

    म्हसवड शहराची भौगोलिक रचना खूप मोठी असून, पालिका परिसरात अनेक छोट्या-मोठ्या वाड्या व वस्त्या आहेत. त्या सर्व ठिकाणी पालिकेने पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकून प्रत्येकाच्या दारी नळ कनेक्शन दिले आहे. मात्र, नळ कनेक्शन दारी असून, ही नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपिट सुरु झाली आहे. याला पालिकेचे ढिसाळ नियोजन व कुचकामी यंत्रणा जबाबदार आहे. पालिकेत पाणी पुरवठा समिती आहे त्यासाठी सभापतीही आहे. मात्र, समितीतील सदस्य आणि सभापतींनाही नागरिकांच्या पाण्याच्या तक्रारीचे काहीही देणे-घेणे नाही तर लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले विरकर हे सुध्दा सध्या पाण्याच्या बाबतीत मौनी बाबाच्या भूमिकेत आहेत.

    म्हसवड शहरात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या जाणवत असताना तत्कालीन युती सरकारने म्हसवड शहरासाठी जीवन प्राधिकरणची वाढीव पाणी पुरवठा योजना अमलात आणून शहरातील पाणी टंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी ही योजना पालिकेकडे संबंधित विभागाने हस्तांतरित केली तेव्हापासून ते आजवर या योजनेतील पाईपलाईनही पालिकेला बदलता आलेल्या नाहीत. २००० साली ही योजना कार्यान्वित झाली, तेव्हापासून प्रत्येक सत्ताधारी आपल्या गटातील कार्यकर्त्याला पाणी जादा कसे मिळेल हेच पाहत आला आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला शेकडो ठिकाणी व्हॉल्व्ह टाकण्यात आलेले आहेत. हे व्हॉल्व्ह टाकण्यामुळे पाईपलाईनची अक्षरश: चाळण झाली आहे.

    शहराच्या ग्रामीण भागासाठी पालिकेने अधिग्रहण केलेल्या विहिरीतून पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या शहरातही अशाच विहिरीतून पाणी पुरवठा केला जात असल्याने पाण्याची चवही बदलत आहे. सध्या तर पावसाळ्याचे दिवस सुरु असतानासुध्दा म्हसवड शहरातील पाणी पुरवठा सुरळीतपणे होऊ शकत नाही. जेव्हापासून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे तेव्हापासून पालिकेने पाणीपट्टीतही वाढ केली आहे, असे असतानासुध्दा शहरवासियांना पिण्याच्या पाण्यासाठी ८ ते ९ दिवस वाट पाहावी लागत आहे. ८ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील काही व्यक्तींनी पाणी साठवण्यासाठी मोठमोठ्या टाक्या बांधल्या आहेत. मात्र, जे जनता सामान्य व गरीब आहे ज्याला राहायला नीट घर नाही अशी लोकं साठवण टँक कोठून उभारणार त्या वर्गाची आजही पिण्याच्या पाण्यासाठी फरफट सुरु आहे. तर शहरातील बहुसंख्य वर्ग हा पिण्याच्या पाण्यासाठी विकत पाण्याचा टँकर घेत असल्याचे चित्र आजही म्हसवड शहरात पाहायला मिळत असून, म्हसवडकरांचे पाण्याची टंचाई कधी संपणार असा संतप्त सवाल म्हसवडकर जनतेतून विचारला जात आहे.