म्हाते-सावली पुलाचा प्रश्न निकाली; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश

    केळघर / नारायण जाधव : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या सावली ते म्हाते दरम्यानच्या पूलाच्या बांधकामासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे नाबार्डच्या माध्यमातून ३ कोटी ८० लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लावल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे म्हाते पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    सावली ते म्हाते दरम्यानचा पूल हा व मेढा मोहाट पुलाअगोदर म्हाते – सावली पुलावरून संपूर्ण दक्षिण जावळी भाग हा जावलीशी जोडला गेला होता. यापूर्वी सर्व वाहतूक सावली-म्हाते पुलावरूनच होत होती. एवढा वर्ष जावळीची वाहतूक खांद्यावर घेऊन पूल जीर्ण अवस्थेत गेला होता. पुलाचे बांधकाम पडझडीला आल्यामुळे पूलाचे काम कधी होणार या प्रश्नाने जावळीचे राजकारण ढवळून निघाले होते.

    अखेर या प्रश्नाकडे विद्यमान आमदार भोसले यांनी लक्ष घालत पुलाचा प्रश्न सोडवत, नाबार्डकडून ३ कोटी ८५ लाख ७० हजार निधी उपलब्ध होऊन पुलाला अंतिम स्वरूपाची प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होईल, अशी माहिती समाजसेवक ज्ञानदेव रांजणे व विकी दळवी यांनी दिली. पुलाच्या बांधकामाचा अंतिम स्वरूपाचा प्रशासन आदेश निघाल्याने म्हाते तथा सावली पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले ग्रामस्थांकडून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार व्यक्त केले जात आहे.