महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्र बंद’ला सातारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद; निषेध मोर्चा

वडूजमध्ये कडकडीत बंद व मोर्चा...महाबळेश्वरमध्येही 'महाराष्ट्र बंद'ला प्रतिसाद...

    सातारा : लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला सातारा शहरासह जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळाला. सातारा, कराड, फलटण, वाई तसेच जिल्ह्याच्या इतर भागात व्यापारी रिक्षाचालक, हॉटेलचालकांनी आपले व्यवहार बंद ठेवले. महाविकास आघाडीच्या वतीने सर्वपक्षीय निषेध फेरी काढण्यात आली असून, त्याचे निवेदन आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांना देण्यात आले.

    लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला सातारा जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला . माण खटाव या दोन्ही तालुक्यात व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळत दैनंदिन व्यवहार बंद ठेवले. राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीतील घटकपक्षाच्या स्थानिक शिलेदारांनी खंडाळा वाई, शिरवळ, जावळी, कराड, पाटण, पाचगणी, महाबळेश्वर तसेच साताऱ्यातही रस्त्यावर उतरून व्यापारी विक्रेते यांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळण्याचे आवाहन केले. उत्तरप्रदेश सरकारसह केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध फेऱ्या सातारा व कराड येथे काढण्यात आल्या. साताऱ्यात राजवाडा ते पोवई नाका अशी निषेध फेरी काढण्यात आली.

    यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, नरेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे दीपक पवार, सेना शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, राजकुमार पाटील काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने रजनी पवार, धनश्री महाडिक यांच्यासह इतर या फेरीत सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी पोवई नाक्यावर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली.

    ==============

    वडूजमध्ये कडकडीत बंद व मोर्चा

    वडूज : लखीमपूर (उत्तरप्रदेश) येथील हिंसाचारी घटना व भारतीय जनता पक्षप्रणित केंद्र शासनाच्याअन्यायकारी धोरणाच्या निषेधार्थ वडूज (ता.खटाव) येथे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघाडीसह मित्रपक्षांच्यावतीने कडकडीत बंद पाळून मोर्चा काढण्यात आला.


    मोर्चात निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, महिला व बालकल्याण सभापती कल्पना खाडे, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, पंचायत समितीच्या सभापती जयश्री कदम, माजी सभापती संदिप मांडवे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. बंडा गोडसे, बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे, मोहनराव देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख युवराज पाटील, नंदकुमार मोरे, प्रा.अर्जुनराव खाडे, पृथ्वीराज गोडसे, नगराध्यक्ष सुनिल गोडसे, माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, नगरसेवक शहाजीराजे गोडसे, विपूल गोडसे यांच्यासह इतर अनेकांची उपस्थिती होती.

    येथील हुतात्मा स्मारकापासून मोर्चाला सुरूवात करण्यात आली. लखीमपूर येथील घटनेच्या व केंद्र शासनाच्या अन्यायकारी धोरणाच्या निषेधाच्या यावेळी घोषणा देण्यात आल्या. तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारात काही काळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रभाकर देशमुख, अशोकराव गोडसे, डॉ. विवेक देशमुख, प्रा. बंडा गोडसे, संदिप मांडवे, छाया शिंदे आदींनी मनोगत व्यक्त करून लखीमपूर येथील घटनेचा व केंद्र शासनाच्या अन्यायकारी धोरणांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. तहसीलदार किरण जमदाडे यांना निवेदन देण्यात आले.

    मोर्चामध्ये डॉ. संतोष गोडसे, तुकाराम यादव, इम्रान बागवान, दाऊद मुल्ला, महेश गोडसे, संतोष दुबळे, सुशांत पार्लेकर, मुमताज मुलाणी, शारदा भस्मे, राणी काळे, सुजाता महाजन, आदी सहभागी झाले होते.

    ==================

    महाबळेश्वरमध्येही ‘महाराष्ट्र बंद’ला प्रतिसाद

    महाबळेश्वर : उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी घटनेचा निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला महाबळेश्वरमध्ये प्रतिसाद चांगला मिळाला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते जमा झाले होते.

    राष्ट्रवादीचे नेते पंचायत समिती सभापती संजय गायकवाड, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, राजेंद्र राजपुरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेश कुंभारदरे, जेष्ठ नेते डी एम बावळेकर, काँग्रेसचे विशाल तोष्णीवाल शरद बावळेकर, नंदकुमार बावळेकर, सलीम बागवान यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर शहरातून मोर्चा काढण्यात आला.

    मोर्चाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेचे राजेश कुंभारदरे व राष्ट्रवादीचे ऍड. संजय जंगम यांनी प्रास्ताविक करून लखीमपूर खिरी घटनेत मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तदनंतर मोर्चास सुरुवात झाली. यावेळी केंद्र सरकारसह, योगी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. हा मोर्चा मुख्य बाजारपेठेत मार्गे सुभाष चौक एसटी स्थानक परिसरातून पंचायत समितीमार्गे तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आला. तहसीलदार कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे नेते सभापती संजय गायकवाड, राजेंद्र राजपुरे, घनश्याम सपकाळ, काँग्रेसचे नंदकुमार बावळेकर आदींची मनोगते व्यक्त करताना लखीमपूर खिरीमध्ये घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात रोष व्यक्त करून निषेध केला.

    त्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी पोलीस निरीक्षक संदीप भागवत उपस्थित होते. तर मोर्चावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्थ ठेवण्यात आला होता. राष्ट्रवादीचे नेते पंचायत समिती सभापती संजय गायकवाड, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेश कुंभारदरे, जेष्ठ नेते डी एम बावळेकर, काँग्रेसचे विशाल तोष्णीवाल, शरद बावळेकर, नंदकुमार बावळेकर, सलीम बागवान यांच्यासह नगरसेवक किसन शिंदे, विमल पार्टे, विमल ओंबळे यांच्यासह इतर अनेकजण सहभागी झाले होते.