आमदार शिवेंद्रसिंहराजे व वेदांतिका राजे यांनी घेतली करोनाची लस

-लस पूर्णपणे सुरक्षित असल्याची दिली स्पष्टोक्ती

    सातारा : सातारा- जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांची पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांनी आज सातारा जिल्हा रुग्णालयात जाऊन करोना प्रतिबंधक लस घेतली. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता करोनावर मात करण्यासाठी शासनाच्या निकषात बसणाऱ्या सर्व जिल्हावासियांनी करोनावरील लस घ्यावी, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.

    सोमवारी दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पत्नी सौ. वेदांतिकाराजेंसोबत जिल्हा रुग्णालयात गेले. त्याठिकाणी दोघांनीही करोनावरील लस घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, डॉ. चंद्रशेखर कारंजकर, डॉ. देवकर, डॉ. दीपक थोरात, डॉ. राजगुरू, डॉ. जाधव, मेट्रन बोबडे मॅडम, परिचारिका रुबिना शेख, मिरासे आदी उपस्थित होते.

    लस घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, करोनाच्या संक्रमण साथीने गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घातला आहे . अजूनही ही साथ आटोक्यात आलेली नाही. रुग्णांची संख्या वाढतेच आहे .करोनापासून स्वतःचे व कुटुंबाचे आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी प्रतिबंधक लस घेणे अत्यावश्यक आहे. शासनाच्या निकषास पात्र असणाऱ्या सर्व नागरिकांनी कोरोनावरील लस घ्यावी आणि करोनाचे संकट थोपवण्यास हातभार लावावा.

    लसीबाबत सोशल मीडियावर चुकीचे समज, गैरसमज आणि अफवा पसरवल्या जात आहेत. त्याकडे कोणीही लक्ष न देता लस घ्यावी आणि करोनापासून मुक्ती मिळवावी. याशिवाय प्रत्येकाने मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा. वारंवार साबणाने हात धुवावेत तसेच सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करावे. या सर्व बाबी प्रत्येकाला माहिती आहेत. त्यामुळे विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये व गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.