वेळ आल्यावर माझे पत्ते ओपन करेन; शशिकांत शिेंदेंचा शिवेंद्रसिंहराजेंवर पलटवार

    सातारा : सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) व विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यात सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे जावलीच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटली आहे. जावलीच्या या आजी-माजी आमदारांचा राजकीय ‘टशन’ जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.

    सर्जापूर ता. जावळी येथील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी निवडणुकांच्या तोंडावर तालुक्यात येणाऱ्या प्रवृत्तींना भुलू नका, असा घणाघात आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता केला होता. मी जावली सोडून कोठे जात नसतो, असा राजकीय संदेश द्यायलाही ते विसरले नाहीत. कुडाळ ता. जावळी येथील ओपन जिमच्या उद्घाटनप्रसंगी मी जावली तालुक्यात येत नव्हतो, पण आता यावे लागेल. जिल्हा कार्यक्षेत्र असताना मला कोणी घेरण्याचा प्रयत्न करू शकत नाही. वेळ आल्यावर मी माझे पत्ते ओपन करेल, असा जोरदार पलटवार आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.

    जावलीच्या या आजी-माजी आमदारांच्या राजकीय जुगलबंदीला सातारा जिल्हा बँक तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संदर्भ आहेत. सोसायटी मतदारसंघातील ठरावावरून जावलीत जिल्हा बँकेच्या निमित्ताने वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे. सहकारच्या आखाड्यात पक्षीय अभिनिवेष नाही हे वारंवार सांगितले जाते. मात्र, जावलीचे राजकारण मात्र सध्या रंगतदार वळणावर पोहचले आहे . शिवेंद्रसिंहराजे हे भाजपमध्ये गेल्याने जावली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं शशिकांत शिंदे यांच्या रूपाने मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे.

    सहा महिन्यांपूर्वी कुडाळ येथे झालेल्या मेळाव्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी विरोधकांना संपविण्याची भाषा केल्याने राष्ट्रवादीच्या या आजी-माजी आमदारांच्या संघर्षाला अधिकच धार चढली आहे. जिल्हा बँकेच्या राजकारणातही शिंदे वरचढ होणार नाही. यासाठी शिवेंद्रसिंहराजे सुध्दा अत्यंत सतर्क आहेत. प्रतापगड कारखान्याच्या राजकारणासह जावली बॅंकेच्या राजकीय समीकरणांमध्येही शिंदे विरोधकांनी डोके वर काढल्याने जावलीच्या राजकारणाचा पट चांगलाच तापला आहे. दोन्ही आमदारांनी बाह्या सरसावल्याने जिल्हा बँकेचे राजकीय धूमशान अधिक संघर्षमय असणार असल्याची चिन्हे आहेत.