सातारा शहरातील सराईत मोबाईल चोरास अटक; ५० मोबाईल जप्त

    सातारा : सातार शहर परिसरात मोबाईल चोरणारा अट्टल चोराला पोलिसांनी गजाआड केले असून, त्याच्याकडून ५० मोबाईल हस्तगत केले आहेत. याची किंमत सुमारे ५ लाख रुपये आहे. विकास अशोक खंडागळे (वय 29, रा. प्रतापसिंहनगर, खेड, ता. सातारा) असे संशयिताचे नाव आहे.

    याबाबत माहिती अशी, 9 जानेवारी रात्री 11.30 ते 10 जानेवारी सकाळी सातच्या दरम्यान शिवराज पेट्रोल पंपाशेजारी संभाजीनगर सातारा येथे नवीन बांधकाम साईटवर पत्र्याच्या उघड्या शेडमधून एकूण 10 हजारांचे मोबाईल चोरी गेले होते. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, शहर व परिसरात वारंवार घडणाऱ्या मोबाईल चोऱ्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर होते. त्यादृष्टीने शहर पोलिस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला.

    आरोपी अज्ञात असल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार पडताळणी करुनदेखील माहिती प्राप्त होत नव्हती. अशात गुन्हे प्रकटीकरण पथकास गोपनीय माहिती मिळाली की, शिवराज पेट्रोल पंपाशेजारी संभाजी नगर सातारा येथे नवीन बांधकाम सुरू असलेल्या साईटवरील चोरीस गेलेले मोबाईल हे प्रतापसिंहनगर सातारा येथील एका व्यक्तीने चोरले आहेत. यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने तात्काळ प्रतापसिंहनगर येथून 1 जुलै रोजी सायंकाळी संशयितास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने शिवराज पेट्रोल पंपाशेजारी संभाजीनगर सातारा येथे बांधकामाचे ठिकाणी पत्र्याचे शेडमधून मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. चोरी केलेल्या मोबाईलपैकी एक 5 हजार किंमतीचा मोबाईल फोन हस्तगत केला आहे.

    पोलिसांनी आरोपीस अटक करुन तो कोठडीत असताना कसून चौकशी केली असता त्याने आणखी वेगवेगळ्या ठिकाणाहून मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून 50 मोबाईल हस्तगत केले असून त्यांची एकूण किंमत 5 लाख 700 रुपये आहे.

    पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक सातारा दलाल, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पोहवा. गुलाब जाधव, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, जोतीराम पवार, शिवाजी भिसे, पो.कॉ. गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश भोंग व विशाल धुमाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.